जवखेडे येथे झालेल्या दलित हत्याकांडावरून करत ठाणे महापालिकेतील सर्वसाधारण सभागृहात सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना भिडल्याचे चित्र गुरुवारी पहायला मिळाले. शहरातील विकासकामांचे अनेक महत्त्वाचे प्रस्ताव पटलावर असताना तसेच डेंग्यूच्या साथीवरील लक्षवेधी सूचनेवर चर्चा अपेक्षित असताना जवखेडेप्रकरणी सभा तहकुबीच्या मुद्दय़ावरून सभागृहात रणकंदन झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की करत सभागृहातच शिव्याचा पाऊस पाडला, तर ज्येष्ठ नगरसेवक म्हणून महापालिका वर्तुळात एरवी तोऱ्यात वावरणारे काँग्रेसचे मनोज िशदे यांनी अधिकाऱ्यांच्या हातातील कागदपत्रे खेचून घेत हवेत भिरकावत बेशिस्तीचा कळस गाठला.
सर्वसाधारण सभेचे कामकाज गुरुवारी सकाळी सुरू होताच रिपब्लिकन पक्षाचे रामभाऊ तायडे यांनी जवखेडे दलित हत्याकांडप्रकरणी सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. मात्र, प्रश्नोत्तराचा तास पूर्ण झाल्यानंतर सभा तहकूब करावी, असा निर्णय महापौर संजय मोरे यांनी घेतला. या तहकुबी सूचनेवर चर्चा सुरू असताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याची ओरड करत सभागृहात तिरडी आणली त्यामुळे गोंधळ वाढला. या गोंधळात सभा तहकूब करण्यात आली.
सभा पुन्हा सुरू झाली तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जवखेडे हत्याकांडाचा मुद्दा सभागृहात मांडत चुकीच्या पद्धतीने सभा तहकूब केली गेल्याचा आक्षेप नोंदवला. वादावादी सुरू असताना मनोज िशदे अचानक सचिव अशोक बुरपुले यांच्या दिशेने धावले आणि सचिवांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून घेऊ लागले.  िशदे यांना रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांना पाचारण करा, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात होती. त्यावर ‘कुणाची िहमत आहे मला हात लावायची..िहमत असेल तर हात लावून दाखवा’, असे आव्हान िशदे देऊ लागले.  हा गोंधळ सुरू असताना शिवसेनेचे संभाजी पंडित आणि राष्ट्रवादीचे गटनेते संजय भोईर यांच्यामध्ये हमरीतुमरी सुरू झाली. मात्र, हा वाद मिटविण्यासाठी पुढे आलेले शिवसेनेचे बालाजी काकडे यांच्यासोबतही संजय भोईर यांची धक्काबुक्की झाली. या गोंधळामुळे सभा दिवसभरासाठी तहकूब करण्याची वेळ महापौरांवर आली.