* नळ, वीज जोडण्या, मलनिस्सारण वाहिन्या तोडणार
* कारवाईसाठी नेमलेल्या पथकाच्या सदस्यांना बढत्या
शीळ-डायघर येथील दुर्घटनेत ७४ निष्पापांचे बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने ठाणे शहरासह मुंब्रा भागातील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी मोहीम आखली असून, त्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामार्फत अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने उद्या, मंगळवारपासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे. अनधिकृत इमारतींच्या नळ व वीज जोडण्या तोडण्याचा आणि मलनि:सारण वाहिन्या पूर्णपणे बंद करण्याचा निर्णयही महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
शीळ-डायघर येथील लकी कंपाऊंडमध्ये उभारण्यात आलेली अनधिकृत इमारत कोसळून झालेल्या अपघातात ७४ जणांचा मृत्यू झाला, तर ३५ जण जखमी झाले. या घटनेनंतर ठाणे शहरासह मुंब्रा तसेच दिवा भागातील अनधिकृत इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पाश्र्वभूमीवर सोमवारी ठाणे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील अनधिकृत बांधकामाविषयी चर्चा केली. या बैठकीत ठाणे शहरासह मुंब्रा भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली असून, महापालिकेचे उपनगर अभियंता अनिल पाटील हे त्याचे प्रमुख असतील. या पथकामध्ये पाटील यांच्यासह दोन कार्यकारी अभियंता, तीन उप अभियंता, सहा कनिष्ठ अभियंता आणि नऊ प्रभाग समित्यांच्या अतिक्रमण पथकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या पथकामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. लकी कंपाऊंडमधील दुर्घटना घडलेल्या इमारतीला खेटूनच असलेल्या दोन अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी पुण्यातून अत्याधुनिक क्रेन आणण्यात आली आहे. या क्रेनच्या साहाय्याने दहा मजल्यापर्यंतच्या इमारतींवर कारवाई करणे सोयीस्कर होते. त्यामुळे या क्रेनच्या साहाय्याने अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
बांधकामांविरोधात पोलिसांची कारवाई
शीळ येथील दुर्घटनेनंतर ठाणे पोलिसांनीही अनधिकृत इमारतींचा शोध घेऊन संबंधित बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्याचे सत्र सुरू केले आहे. मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीमध्ये पाच मजली अनधिकृत इमारत उभारत असल्याप्रकरणी बिल्डर निजामउद्दीन, बिलाल काझी, मोती भगत आणि ठेकेदार मेहबूब अब्दुल सत्तार शेख यांच्याविरोधात मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मेहबूब याला अटक करण्यात आली असून उर्वरीत तिघांचा शोध सुरू आहे. तसेच मुंब्रा येथील कादर पॅलेस परिसरात तीन मजली अनधिकृत इमारत उभारत असल्याप्रकरणी बिल्डर मोबीन ताडे याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. या दोन्ही गुन्ह्य़ामध्ये पोलीस स्वत: फिर्यादी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.