आठ महिने उशीराने गठीत झालेल्या ठाणे महापालिका स्थायी समितीचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत असल्याचा अभिप्राय राज्य शासनाने महापालिका प्रशासनाला गुरूवारी दिला आहे. तसेच येत्या एप्रिल महिन्यात स्थायी समितीमधील ५० टक्के सदस्यांना चिठ्ठी पद्धतीने निवृत्त करून त्या जागी नव्या सदस्यांची नेमणूक करण्यासंबंधीच्या सूचनाही केल्या आहेत. त्यामुळे स्थायी समितीचे सभापती रविंद्र फाटक यांच्या पदाचा तसेच निवृत्त होणाऱ्या ५० टक्के सदस्यांचा कार्यकाळ अल्पवधीचा ठरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
ठाणे महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतरही राजकीय वादात तसेच न्यायालयाच्या फेऱ्यात अडकल्यामुळे स्थायी समिती गठीत होऊ शकली नव्हती. सुमारे आठ महिने उशीराने स्थायी समिती गठीत झाली होती. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजप युतीला पाठींबा देणाऱ्या मनसेने अचानक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापालिकेतील शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ समान झाले. परिणामी स्थायी समितीमध्ये दोघांच्या सदस्यांचे संख्याबळ समान झाले.
त्यामुळे स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक चुरशीची झाली होती. अखेर चिठ्ठी पद्धतीने काँग्रेसचे नगरसेवक रविंद्र फाटक यांची सभापती पदी निवड झाली होती. मात्र, शासनाच्या अभिप्रायामुळे रविंद्र फाटक यांच्या सभापती पदाचा कार्यकाळ अल्पावधीचा ठरणार आहे, अशी माहिती महापालिका सुत्रांनी दिली.
आठ महिने उशीरा गठीत झालेल्या स्थायी समितीचा कार्यकाळ किती असावा, यासंबंधी महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे अभिप्राय मागितला होता. गुरूवारी राज्य शासनाने अभिप्राय कळविला असून स्थायी समितीचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2013 रोजी प्रकाशित
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचा कार्यकाळ एप्रिलपर्यंतच
आठ महिने उशीराने गठीत झालेल्या ठाणे महापालिका स्थायी समितीचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत असल्याचा अभिप्राय राज्य शासनाने महापालिका प्रशासनाला गुरूवारी दिला आहे. तसेच येत्या एप्रिल महिन्यात स्थायी समितीमधील ५० टक्के सदस्यांना चिठ्ठी पद्धतीने निवृत्त करून त्या जागी नव्या सदस्यांची नेमणूक करण्यासंबंधीच्या सूचनाही केल्या आहेत.
First published on: 01-03-2013 at 02:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane standing committe working period extended till april