‘शेवटच्या डीसी लोकल’चे दोन डबे कचरा गोळा करण्याच्या कामाला
भारतीय रेल्वेच्या इतिहासातील डीसी विद्युतप्रवाहावरील शेवटच्या डीसी लोकलला मोठय़ा धूमधडाक्यात निरोप देणाऱ्या मध्य रेल्वेने याच ऐतिहासिक गाडीचे दोन डबे सध्या आपल्या कचरा गाडीला जोडले आहेत. दिल्लीच्या रेल्वेसंग्रहालयात दिमाखात झळकण्याच्या अपेक्षेने कारशेडमध्ये गेलेल्या या गाडीचे दोन डबे सध्या मध्य रेल्वेवरील कचरा उचलत आहेत.
हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने ९-१० एप्रिलच्या मध्यरात्री डीसी-एसी परिवर्तन पूर्ण केले. त्या वेळी कुर्ला ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यादरम्यान मध्य रेल्वेने शेवटची डीसी लोकल वाजतगाजत चालवली. विशेष म्हणजे तत्कालीन महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी शेवटच्या डीसी लोकलला निरोप देण्यासाठी मोठमोठय़ा योजना आखल्या होत्या. या लोकलला रंगरंगोटी करून प्रत्येक डब्यातील आसनांना आसनक्रमांक देण्यात आले होते. तसेच प्रत्येक आसनासाठी १० हजार रुपयांचे तिकीट ठेवून ही रक्कम लातूरमधील दुष्काळग्रस्तांसाठी पाठवण्याचे ठरले होते. तसेच १० हजार रुपयांचे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांचा मेणाचा पुतळा बनवून तो याच लोकलच्या डब्यात ठेवून ही गाडी दिल्लीच्या रेल्वे संग्रहालयात जतन करण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात एकही तिकीट विकले गेले नाही.
ही गाडी मध्य रेल्वेने त्यानंतर कुर्ला स्थानकाबाहेर बेवारस अवस्थेत उभी केली होती. त्या वेळी या गाडीत निरोध, दारूच्या बाटल्या, फाटलेले कपडे अशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या होत्या. त्या वेळीही ‘लोकसत्ता मुंबई’ने ३० एप्रिलच्या अंकात ‘इथे ओशाळला इतिहास’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर ही गाडी सानपाडा कारशेडमध्ये पाठवण्यात आली. या कारशेडमध्ये या गाडीचे ७६३१९ आणि ७६२९६ हे क्रमांक असलेले दोन डबे काढून ते मध्य रेल्वेच्या कचरा गाडीला जोडण्यात आले. तर उर्वरित डबे कुर्ला कारशेडमध्ये पाठवण्यात आले. उरलेल्या डब्यांपैकी दोन डबे एसी विद्युतप्रवाहावर चालतील, अशी व्यवस्था करून हे डबे सध्या हार्बर मार्गावर चालवले जात आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या घोषणाबाजीवर प्रश्न निर्माण होत आहे.

मध्य रेल्वेने डीसी लोकलचे तीन डबे कुर्ला कारशेडमध्ये जपून ठेवले आहेत. या डब्यांसह डीसी विद्युतयंत्रणा, एसी विद्युतप्रवाहात झालेले परिवर्तन आदी गोष्टी जपल्या जाणार आहेत. येथे उत्तम संग्रहालय केले जाणार आहे. शेवटची म्हणून चालवलेल्या गाडीचे आयुर्मान अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे या गाडीचे काही डबे काढून ते मध्य रेल्वेच्या सेवेत घेतले आहेत.
– ए. के. श्रीवास्तव, साहाय्यक महाव्यवस्थापक

शेवटच्या डीसी लोकलचे सर्व डबे वस्तुसंग्रहालयात जपण्याची घोषणा झाली होती. यापैकी एक डबा ठाणे स्थानकाच्या बाहेर स्मृतिचिन्ह म्हणून ठेवण्यात येईल, असेही सांगितले होते. या सर्व घोषणा ‘शेवटच्या डीसी लोकल’बद्दल झाल्या होत्या. आज त्याच गाडीचे दोन डबे रेल्वेमार्गाच्या बाजूचा कचरा उचलण्यासाठी वापरले जात असतील, तर मग खोटे वायदे कशासाठी?
– नंदकुमार देशमुख, उपनगरीय प्रवासी एकता महासंघ