विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात अनास्थेचे विघ्न

मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचे ग्रंथालयांकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

विद्यापीठाच्या कलिनातील ग्रंथालयाच्या ढासळलेल्या भिंतीची डागडुजी नाही

मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचे ग्रंथालयांकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे. राजाबाई टॉवरमधील ग्रंथालयाची दुरवस्था उघड झाल्यानंतर आता कलिना येथील ग्रंथालयाची अवस्थाही फारशी बरी नसल्याचे समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी भिंत पडल्यामुळे बंद झालेल्या ग्रंथालयाच्या भाषा विभागासह इतरही काही विभाग बंद झाल्याने येथे अभ्यासाकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.

सध्या विद्यापीठाची ‘नॅक’च्या आघाडीवर प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा तपासून त्यांना ‘नॅक’कडून मानांकन दिले जाते. त्यात ग्रंथालये, प्रयोगशाळा यांचाही विचार प्राधान्याने केला जातो. त्यासाठी ग्रंथालय सुसज्ज असणे, तेथील ग्रंथसंपदा, संदर्भ ग्रंथ हा विद्यापीठांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा असतो. मात्र मुंबई विद्यापीठ याला अपवाद असल्याचे दिसत आहे.  विद्यापीठाच्या फोर्ट येथील संकुलातील राजाबाई टॉवरमधील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ग्रंथालयाच्या इमारतीची दुरवस्था काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. आता कलिना येथील ग्रंथालयाकडेही विद्यापीठाचे दुर्लक्षच होत असल्याचे दिसत आहे.

केवळ विद्यापीठातीलच नव्हे तर आयडॉल, इतर महाविद्यालयांमधील विद्यार्थीही ग्रंथालयात संदर्भ ग्रंथ, साहित्य वा अभ्यासाकरिता येत असतात. एव्हाना विषय विभागांचे, महाविद्यालयांचे कामकाज सुरू झाले आहे. अध्ययन- अध्यापन सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची ग्रंथालयांमधील गर्दीही वाढू लागते. कलिना येथील ग्रंथालयातील भाषा आणि इतर काही विभाग गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे अडचण होत असल्याची तक्रार विद्यार्थी आणि शिक्षकांकडून करण्यात येत आहे. पुस्तके, संदर्भ ग्रंथ मिळत नाहीत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ग्रंथालयाच्या इमारतीची भिंत काही महिन्यांपूर्वी पडली. त्यानंतर या इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी त्या बंद करण्यात आल्या. मात्र अद्यापही हे काम पूर्ण न झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

‘ग्रंथालयाची इमारत चार विभागांमध्ये विभागण्यात आली आहे. इमारतींचे नूतनीकरण करण्यासाठी इमारत बंद करण्यात आली होती. त्यापैकी ‘बी’ विभागाचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे. आता ‘सी’ विभागाचे काम सुरू आहे. त्यामुळे ‘बी’ विभागात सर्व पुस्तके, कपाटे हलवण्याचे काम सुरू असून हे काम आता संपत आले आहे. लवकरच विद्यार्थ्यांना पुस्तके मिळू शकतील.

– डॉ. दिनेश कांबळे, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The library of the university of kalina is not a collapsed wall repair

ताज्या बातम्या