कार चालविण्यास पालकांनी नकार दिल्याने घरातून चावी चोरून कार चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने दोन रिक्षांसह तीन मोटारसायकलींना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या मुलासह एक रिक्षाचालक जखमी झाला असून अन्य सर्वजण सुदैवाने बचावले आहेत. घोडबंदर येथील हिरानंदानी मेडोस परिसरात गुरुवारी सायंकाळी हा अपघात घडला असून या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरानंदानी मेडोसमध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलास कार चालविण्याची मोठी हौस होती. त्याचे वडील एका नामांकित कंपनीच्या पुण्यातील प्रकल्पामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. या मुलाने कार चालविण्यासाठी वडिलांकडे चावी मागितली होती. पण, अल्पवयीन असल्यामुळे वडिलांनी त्याची मागणी धुडकावून लावली. त्यामुळे त्याने गुरुवारी घरातून चावी चोरली आणि कार चालविण्यासाठी निघाला. दरम्यान, हिरानंदानी मेडोस परिसरात कार चालवित असताना एका कुत्र्याला वाचविण्याच्या नादात त्याने ब्रेक दाबताच त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने दोन रिक्षांसह तीन मोटारसायकलींना धडक दिली. यामध्ये तो मुलगा आणि रिक्षाचालक बहुदी हरिजन जखमी झाला असून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात बहुदीच्या डोक्याला सुमारे १६ ते १७ टाके पडले आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.