मुंबई : राज्यात अचानकपणे आणि धक्कादायकरीत्या झालेल्या सत्तांतरानंतरही महाविकास आघाडीचे अस्तित्व कायम राहिले पाहिजे, अशी भूमिका काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मांडण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी सभागृहात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपली भूमिका मांडण्याऐवजी राजीनामा दिल्याबद्दल काही नेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

राज्यात ज्या अनपेक्षितपणे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवून सरकार स्थापन केले, त्याच पद्धतीने आघाडी सरकारही धक्कादायकरीत्या कोसळे. शिवसेनेतच फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार डळमळीत झाले होते. सरकार वाचविण्याचे प्रयत्न अपयशी ठरू लागल्याचे दिसताच, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आघाडी सरकारची ३१ महिन्यांची कारकीर्द संपुष्टात आणली.

वेगाने घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. नितीन राऊत, प्रा. वर्षां गायकवाड, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत विधान भवनात पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर काही ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. ठाकरे यांनी सभागृहात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊन आपली भूमिका मांडून मग राजीनामा द्यायला हवा होतो, त्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले असते, असे काही ज्येष्ठ नेत्यांचे मत होते. मात्र त्याऐवजी त्यांनी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधून राजीनामा दिला, या ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर काही नेत्यांनी नाराजीचा सूर लावला. परंतु बैठकीनंतर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, नाना पटोले  यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन काँग्रेस आघाडीसोबत असल्याचे संकेत दिले.

समन्वयातून रणनीती

तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी कायम ठेवण्याबाबत चर्चा झाली. महाविकास आघाडी अजून अस्तित्वात आहे, समन्वयाने आघाडीची पुढील रणनीती ठरविली जाईल, असे अशोक चव्हाण यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.