प्रति मृत उंदीर १८ रुपये देऊनही संस्था उदासीन; पुन्हा निविदा काढण्याचा प्रयत्न
मंत्रालयातील साडेतीन लाख उंदरांना सात दिवसात मारल्याची चर्चा रंगली असतानाच शहरात मात्र प्रति उंदरामागे १८ रुपये देण्याची तयारी दाखवूनही उंदीर मारण्यासाठी संस्था पुढे येत नसल्याचा अनुभव गेली दोन वर्षे पालिकेला येत आहे. वारंवार निविदा काढूनही शहरातील २४ पैकी केवळ पाच वॉर्डमध्येच काम करण्यासाठी संस्थांनी तयारी दाखवली असून उपनगरांमध्ये रात्री प्रकाश असल्याने उंदीर मिळत नसल्याची तक्रार करून एका संस्थेने काम सोडून दिले. त्यामुळे पालिका आता १९ वॉर्डसाठी पुन्हा एकदा निविदा काढण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे.
मुंबईत लेप्टोस्पायरोसिसच्या साथीत २०१५ मध्ये १२ जणांना आणि २०१६ मध्ये ७ जणांना जीव गमवावा लागला होता. लेप्टोसारखा गंभीर आजार पसरवणाऱ्या उंदरांना मारण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मूषकसंहारक नेमले आहेत. दरवर्षी साधारणपणे अडीच ते तीन लाख उंदीर मारले जातात. म्हणजेच दर दिवशी संपूर्ण शहरात सरासरी ७०० उंदीर मारले जातात.
पालिकेच्या मूषकसंहारकांचे काम मुख्यत्वे दक्षिण मुंबईत होते. मात्र उपनगरांमध्येही उंदरांचा सुळसुळाट वाढल्याने तिथेही मूषकसंहारक नेमण्याची मागणी वाढत होती. त्यातच २०१५ मधील लेप्टोच्या साथीमुळे प्रत्येक वॉर्डनुसार मूषकसंहारक संस्था नेमण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. सुरुवातीला एक उंदीर मारण्यासाठी १० रुपये दर होता. नंतर तो वाढवून १८ रुपये करण्यात आला. मात्र नालेसफाई, रस्तेकंत्राट, कचरा वाहतुकीसाठी २५ ते ४० टक्के कमी दराने काम करायला कंत्राटदार तयार असताना उंदीर मारण्यासाठी मात्र फारशा संस्था पुढे येत नाहीत. याचे कारण म्हणजे उंदीर दाखवा आणि पैसे मिळवा हे ब्रीद. दररोज सकाळी वॉर्डमधील आरोग्य कर्मचारी ताजे मृत उंदीर मोजून घेतो त्याचप्रमाणे परेल येथील केंद्रावरही पुन्हा एकदा उंदीर मोजले जातात. उंदीर त्या रात्रीत मारलेला हवा, एवढीच अट घालण्यात आली आहे. कीटकनाशक विभागाची करडी नजर असल्याने यात फेरफार करता येत नाही, असे कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर म्हणाले.
शहरात आता फक्त डी, ई, एम पश्चिम, एस आणि एन वॉर्डमध्ये मूषक संहारक संस्था आहेत. पालिकेने नेमलेल्या मूषकसंहारांना आता रात्रपाळीऐवजी दिवसा काम दिले जाणार असल्याने सर्व वॉर्डमध्ये संस्था नेमण्यासाठी पुन्हा एकदा निविदा काढाव्या लागणार आहे. मात्र उंदीर मारण्यासाठी तोच दर असल्याने व त्यात संस्थांना फारसा लाभ दिसत नसल्याने पालिकेपुढील मूषकसंहाराचे आव्हान कायम आहे.
प्रकाशामुळे उंदीर सापडत नाहीत
दक्षिण मुंबईत हाउसगल्ल्यांमध्ये उंदरांचा सुळसुळाट असतो. त्यामुळे उंदीर सापडतात. मात्र उपनगरात रात्रीही विजेचा एवढा प्रकाश असतो की उंदीर सापडत नसल्याचा दावा करत कांदिवलीमधील संस्थेने उंदीर मारण्याचे काम सोडून दिले.
पालिकेने मारलेले उंदीर
- जानेवारी ते डिसेंबर २०१६ – २ लाख १० हजार ७३७
- जानेवारी ते डिसेंबर २०१७ – २ लाख ४८ हजार २८४
लेप्टोसारखा गंभीर आजार पसरवणाऱ्या उंदरांना मारण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मूषकसंहारक नेमले आहेत. या २७ मूषकसंहारकांना दर रात्री किमान ३० उंदीर मारण्याचे लक्ष्य त्यांना देण्यात येते. उंदीर मारण्यासाठी सापळा, विष, बिळावर फवारण्याचे औषध किंवा थेट काठीने उंदीर मारणे अशा विविध पद्धतींचा वापर केला जातो.