प्रख्यात कंपनी आणि प्रसिद्ध टीव्ही चॅनेल निर्मित सिरियलमध्ये भुमिका देण्याचे आमिष दाखवत नवोदित कलाकारांकडून नेटबँकिंग आणि पेटीएमद्वारे रक्कमा स्वीकारून गंडा घालणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. अविनाश शर्मा आणि विनोद भंडारी अशी त्यांची नावे आहेत. गोरेगाव परिसरातून या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याची कबुलीही दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार, चित्रपटसृष्टीत नामांकीत असलेल्या आदित्य आणि श्रुती जैन यांच्या नावाचा वापर करीत सिटा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा पदाधिकारी असल्याचे सांगत तसेच एका प्रसिद्ध वाहिनीने निर्मित विविध टीव्ही मालिकांमध्ये भुमिका मिळवून देण्याच्या आमिषाने अविनाश शर्मा आणि विनोद भंडारी स्ट्रगलर कलाकारांना लुटत असत. नवोदित कलाकारांना त्यांची निवड झाली याची माहिती त्यांना देण्यासाठी बनावट ई-मेल्स पाठवत असत. त्यानंतर नेटबँकिंग आणि पेटीएमच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे घेतले जात.

या दोघा आरोपींनी जवळपास ७० ते ७५ नवोदित कलाकारांना गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी अविनाश शर्मा आणि विनोद भंडारी यांनी स्टार इंडिया टीव्हीच्या लोगोचा वापर या गुन्ह्यात केला आहे. आरोपी हे वेब डिझाईनर होते. या संबंधित कंपनीत काही काळ त्यांनी कामही केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर ही फसवणुकीची कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी नवा धंदा सुरु केला.

याबाबतची तक्रार गुन्हे शाखा ९ यांच्याकडे दाखल होताच शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर जाधव यांनी सखोल तपास करून एका संशियातला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले त्यानंतर पोलिसांच्या पथकाने गोरेगाव येथून दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is fraud for snare of giving chance of acting in tv serials two people arrested
First published on: 08-01-2019 at 05:38 IST