महाराष्ट्राच्या चित्ररथाबद्दल देशभर उत्सुकता असते. दिल्लीच्या विजयपथावरील संचलनात अनेक वर्षे राज्याने प्रथम क्रमांक पटकविला होता. पण केवळ मंत्री, सचिव आणि सांस्कृतिक संचालनालयातील विसंवादामुळे यंदा राज्याचा चित्ररथच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिसणार नाही.
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात चित्ररथाच्या माध्यमातून आपल्या राज्यातील सांस्कृतिक ठेवा देशवासीयांसमोर मांडण्याची संधी असते. राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक वर्षी या संचलनासाठी राज्याचा चित्ररथ दिमाखात दिसतो. आजवर लावणी, कीर्तन, जेजुरीचा खंडोबा, आदिवासी कला अशा अनेक विषयावरील राज्याचे चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झाले असून त्यातील काही चित्ररथांना पारितोषिकेही मिळाली आहेत. एवढेच काय तर सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक पटकाविण्याचा पराक्रमही राज्याच्या नावावर आहे.
प्रथेप्रमाणे यंदाही राज्याचा चित्ररथ दिल्लीला पाठविण्यात येणार होता. मात्र सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे, या खात्याचे सचिव आनंद कुलकर्णी, संचालक आशुतोष घोरपडे आणि सहसंचालिका मीनल जोगळेकर यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे चित्ररथाची प्रवेशिकाच वेळेत पोहोचू शकली नाही. परिणामी राज्य सरकारच्या चित्ररथास यंदाच्या संचलनात भाग घेता येणार नसल्याचे केंद्र सरकारच्या समितीने कळविले आहे. यंदाच्या संचलनात कोणत्या विषयावरील चित्ररथ पाठवायचा हा घोळ कारणीभूत ठरल्याचे समजते. स्त्री भ्रूण हत्येवर चित्ररथ तयार करण्याची कल्पना पुढे आली होती. भारतीय चित्रपटसृष्टीच्या १०० वर्षांच्या वाटचालीचा विषय असावा, असा पर्याय चर्चेला आला होता. सांस्कृतिक खात्याचे मंत्री देवतळे यांच्याकडे पर्यावरण हे खातेसुद्धा असल्याने पर्यावरण हा चित्ररथाचा विषय असावा, अशी सूचना काही जणांनी केली. या गोंधळात प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी निघून गेला.  राज्याच्या वतीने दिल्लीत प्रजासत्ताक दिन संचलन समितीकडे हा प्रस्ताव गेला तोवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एनएफडीसीकडून भारतीय चित्रपटसृष्टीची १०० वर्षे या विषयावरील चित्ररथाचा प्रस्ताव दाखल केला गेला होता. त्यामुळे राज्याची प्रवेशिका फेटाळण्यात आली. त्यामुळे यंदाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही.     
मंत्र्यांची कबुली
या घोळाबाबत राज्याचे सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, राज्य सरकारने वेळेत प्रस्ताव पाठविला होता. मात्र याच विषयावरील एनएफडीसीचा प्रस्ताव स्वीकारण्यात आल्याने राज्याचा प्रस्ताव स्वीकारला गेला नाही, अशी कबुली त्यांनी दिली. तर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथास जरी स्थान मिळाले नसले तरी त्याच दिवशी शिवाजी पार्कवर होणाऱ्या संचलनात हा चित्ररथ सहभागी होणार असल्याचे सांस्कृतिक कार्यसंचालक आशुतोष घोरपडे यांनी सांगितले.