स्वाइन फ्लूमुळे दोन वर्षांची बालिका आणि ६० वर्षांवरील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत या साथीने नऊ जणांचा मृत्यू झाला. जूनमध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या सात महिन्यांत  मृतांचा आकडा ३६ वर पोहोचला आहे.
नळबाजार येथील ६३ वर्षांच्या वृद्धाला ११ ऑगस्ट रोजी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल केल्यापासून त्यांना ओसेल्टामिव्हिर औषध सुरू करण्यात आले. त्यांना इतर कोणतेही आजार नव्हते. दोन दिवसांनी, १३ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. पवई येथील ७४ वर्षांच्या वृद्धावर सहा ऑगस्ट रोजी होली स्पिरिट रुग्णालयात उपचारांना सुरुवात झाली. त्यांना रक्ताचा कर्करोग होता. आठ ऑगस्टपासून त्यांना ओसेल्टामिव्हिर सुरू करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि १४ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.
चेंबूर येथील बालिकेला १५ ऑगस्ट रोजी राजावाडी रुग्णालयात आणले गेले. तातडीने ओसेल्टामिव्हिर सुरू करूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. या तीन मृत्यूंमुळे ऑगस्टच्या मध्यावरच स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या नऊ वर पोहोचली आहे. जुलैमध्ये स्वाइन फ्लूचे सात बळी होते. ऑगस्टमध्ये स्वाइन फ्लूच्या २२८ रुग्णांची नोंद झाली असून फेब्रुवारीपासून आतापर्यंत रुग्णांची संख्या २२६९ वर पोहोचली आहे.