|| सुहास जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षभरात ६२ वाघांच्या मृत्यूचे कारण शोधण्यात अपयश

वाघांच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करून ४५ वर्षांपूर्वी व्याघ्र संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आले, परंतु त्यांच्या मृत्यूच्या नोंदीकडे आणि मृत्यूची कारणे शोधण्यात अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.

जानेवारी २०१८ ते एप्रिल २०१९ दरम्यान देशभरात १३१ वाघांच्या मृत्यूंची नोंद झाली, परंतु यापैकी ६२ वाघांच्या मृत्यूचे नेमके कारण संबंधित यंत्रणांना अद्यापही शोधता आलेले नाही. तर २०१९ मधील ३६ मृत्युनोंदींची छाननी आजही सुरू आहे. १९ वाघांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याची नोंद आहे.

वाघांच्या मृत्यूच्या नोंदी संकलित करणाऱ्या ‘टायगरनेट’ या व्याघ्र प्रकल्पाच्या संकेतस्थळावर या नोंदींचे विस्तृत वर्गीकरण करण्यात येते. मृत्यूच्या कारणांचा छडा नेमकेपणाने लावला नसेल तर वाघांचे संवर्धन सक्षमपणे कसे करणार, असा प्रश्न वन्यजीव अभ्यासकांनी उपस्थित केला आहे.

वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आले. ‘टायगरनेट’ हे संकेतस्थळ ‘व्याघ्र प्रकल्प प्राधिकरणा’ची माहितीसाठा सांभाळणारी यंत्रणा आहे. या संस्थेकडील नोंदींमध्ये ढिसाळपणा आढळतो. या संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. अनुप कुमार नायक म्हणाले, ‘‘वाघांच्या मृत्यूची माहिती प्रकल्प संचालकांकडून आल्यावर नोंदवली जाते. त्यानंतर शवविच्छेदन, न्यायवैद्यक प्रयोगशाळांचा अहवाल, पुरावे आणि इतर कागदपत्रे आल्यानंतर मृत्यूच्या कारणांची नोंद केली जाते; पण राज्यांकडून या संदर्भातील माहिती मिळण्यास उशीर लागतो. त्यामुळे मृत्यूचे कारण ठोसपणे सांगता येत नाही.’’

‘टायगरनेट’ या संकेतस्थळावरील नोंदीनुसार महाराष्ट्रात २०१८ मध्ये २० वाघांच्या मृत्यूची नोंद आहे; परंतु त्यापैकी ११ वाघांच्या मृत्यूची कारणे माहीत नाहीत, तर चार वाघांना नैसर्गिक मृत्यू आल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात यंदा जानेवारी ते एप्रिलदरम्यान सहा वाघांचे मृत्यू झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू नैसर्गिक आहे.

महाराष्ट्रात दोनच पशुवैद्यकीय अधिकारी

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वाघाचे शवविच्छेदन आणि त्यानंतर गरजेनुसार न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल यांची पूर्तता करण्यास सहा महिने पुरेसे असतात; परंतु त्यासाठी दीड र्वष लागणे अनाकलनीय आहे. व्याघ्र  प्रकल्प अथवा संरक्षित अभयारण्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव असतो. महाराष्ट्रात वनखात्याचे केवळ दोनच पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. आणखी दहा वैद्यकीय अधिकारी नेमण्याचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे.

२०१८ पूर्वीच्या नोंदी हटवल्या

वाघांच्या मृत्यूसंदर्भातील २००९ ते २०१७ या कालावधीतील नोंदी संकेतस्थळावरून हटवण्यात आल्या आहेत. या कालावधीतील ६३१ व्याघ्रमृत्यूंच्या नोंदीमध्ये प्रचंड गोंधळ होता. या नोंदींपैकी २६१ वाघांच्या मृत्यूचे कारणच शोधलेले नव्हते, तर फक्त १२९ वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद होती. सध्या प्राधिकरणाचे अधिकारी केवळ २०१२ नंतरच्या नोंदींबद्दलच बोलत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger killing in maharashtra
First published on: 12-05-2019 at 01:17 IST