गुटखा, पानमसाल्याच्या साठवण आणि विक्रीवर राज्य सरकारने घातलेल्या बंदीविरोधात किरकोळ तंबाखू विक्रेते व टपरीधारक यांनी संघर्ष पुकारला आहे. दारू तसेच संसर्गजन्य आजारांमुळे अधिक मृत्यू होत असताना तंबाखूची विक्री रोखणे अन्यायकारक आहे, असा पवित्रा घेत राज्यभरातील सर्व विक्रेते १६ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत.
राज्य सरकारने १८ जुलैपासून सुगंधी गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी यांची निर्मिती, साठवण व विक्रीवर बंदी घातली. मात्र त्यांच्या विक्रीवर राज्यभरातील ४० लाख व्यक्तींचा रोजगार अवलंबून असल्याचे ‘मुंबई बिडी- तंबाखू व्यापारी संघ’ तसेच राज्यातील इतर बिडी- तंबाखू व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्य सरकारने तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादक, वितरक, विक्रेते यांना प्रतिनिधित्व देऊन एक उच्चस्तरीय समिती स्थापन करावी आणि सहा महिन्यांच्या कालावधीत अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगावा. तोपर्यंत ही बंदी अंमलात आणू नये अशी मागणी संघाच्या प्रतिनिधींनी केली.