पंतप्रधानांच्या संकल्पनेतील ‘स्वच्छ मुंबई’बाबत पालिकेची हतबलता; पालिका आयुक्तांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

झोपडपट्टय़ांमधील दाटीवाटी, पाण्याचा अभाव, मलवाहिन्या टाकण्यासाठीही जागा उपलब्ध नसणे अशा विविध कारणांमुळे ‘एक घर, एक शौचालय’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न मुंबईपुरते तरी भंगण्याची चिन्हे आहेत. कारण, मुंबईच्या दाटीवाटीने वसलेल्या झोपडीपट्टीत प्रत्येक झोपडीत शौचालय बांधणे अशक्य असल्याचे पालिकेला अखेर वर्षभराच्या प्रयत्नानंतर लक्षात आले आहे. म्हणून पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’ स्वप्नाच्या उत्तुंगतेलाच कात्री लावून प्रत्येक घराऐवजी वस्तीकरिताच सार्वजनिक शौचालय बांधून ‘स्वच्छ मुंबई’चे स्वप्न साकार करण्याची मुभा द्या, असे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती करण्याची वेळ पालिका आयुक्तांवर आली आहे.

मुंबईमध्ये आजही ११७ ठिकाणी उघडय़ावर प्रातर्विधी उरकले जातात. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या पाहणीत देशाच्या या आर्थिक राजधानीचा क्रमांक इतर छोटय़ा शहरांच्या तुलनेत फारच खाली घसरला होता. केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत देशभरातील झोपडय़ांमध्ये शौचालय बांधण्याची योजना जाहीर मुंबईमध्ये आजही ११७ ठिकाणी उघडय़ावर प्रातर्विधी उरकले जातातकेली. मुंबईमध्ये १ लाख १७ हजार झोपडय़ांमध्ये  शौचालय बांधण्याचे लक्ष्य मुंबई महापालिकेला देण्यात आले. झोपडीमध्ये शौचालय बांधण्यासाठी केंद्राकडून चार हजार, राज्य सरकारकडून एक हजार आणि पालिकेकडून दोन हजार रुपये अनुदान दिले जाते. त्याचबरोबर मुंबईमध्ये ५,४०० सार्वजनिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट पालिकेला केंद्राने दिले ते वेगळेच.

झोपडीमध्ये शौचालय बांधून मिळणार हे समजताच झोपडपट्टीवासीयांचे चेहरे उजळले. मात्र दाटीवाटीने शहरात आडव्यातिडव्या पसरलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये घरटी शौचालय बांधण्यासाठी जागाच नाही. तसेच अनेक झोपडपट्टय़ांमध्ये मलनिस्सारण आणि मलवाहिन्यांचेही जाळे नाही. दाटीवाटीच्या उभ्या असलेल्या झोपडय़ांमध्ये मलवाहिन्यांचे जाळे उभारणे अशक्य आहे. पालिकेने मलवाहिनीपासून ३० मीटरच्या अंतरावर असलेल्या झोपडीमध्ये शौचालय बांधून ते छोटय़ा मलवाहिनीने मोठय़ा वाहिनीला जोडण्याचे ठरविले. मात्र अशा झोपडय़ा फारच कमी आहेत.

झोपडपट्टय़ांच्या भौगोलिक स्थितीमुळे १ लाख १७ हजार झोपडपट्टय़ांमध्ये शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणे अवघड आहे. परिणामी, सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविण्यास परवानगी द्यावी, अशी विनंतीपत्र पालिकेने सरकारला पाठविले आहे. मात्र या पत्राचे उत्तर अद्याप पालिकेला मिळालेले नाही.

सद्य:स्थिती

  • आजपर्यंत पालिकेकडे ६००९ झोपडीवासीयांनी झोपडीत शौचालय बांधण्यासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी केवळ २,४८८ अर्जाची छाननी करून निकषांमध्ये बसत असलेल्या १,८१९ झोपडय़ांमध्ये शौचालय बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • अपुरी जागा आणि जवळपास मलवाहिनी उपलब्ध नसल्याने १६९ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
  • आतापर्यंत प्रत्यक्षात ५७ झोपडय़ांमध्ये शौचालये बांधण्यात आली आहेत, तर ३६ झोपडय़ांमध्ये शौचालय उभारणीचे काम सुरू आहे.
  • अर्जाची छाननीही संथगतीने सुरू असल्यामुळे ३,५२१ झोपडय़ांमधील रहिवाशांचे डोळे झोपडीत शौचालय बांधून मिळणार की नाही याकडे लागले आहेत.

छोटय़ा छोटय़ा झोपडय़ांमध्ये शौचालय बांधणे शक्य नाही. त्यामुळे झोपडीतील शौचालयांऐवजी ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत मोठय़ा संख्येने सार्वजनिक शौचालये बांधण्यास परवानगी द्यावी.

– अजोय मेहता, पालिका आयुक्त