टोलनाक्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश

टोलमुक्तीचे आश्वासन देत पाच वर्षांपूर्वी निवडणुकांच्या रणधुमाळीत काँग्रेस आघाडी सरकारच्या नाकीनऊ आणणाऱ्या सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीला शहराच्या वेशीवर उभ्या राहिलेल्या टोलनाक्यांतून आणि तिथे होणाऱ्या प्रचंड अशा कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव आणि मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील टोलनाके मुदत पूर्ण झाल्यामुळे बंद झाले आहेत. परंतु मुलुंड, दहिसर, ऐरोली, वाशी येथे मुंबईच्या वेशीवर उभारण्यात आलेले टोलनाके अजूनही सुरू आहेत. शिवाय पिवळ्या पट्टीचे नियम, पाच किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील नागरिकांची टोलमधून सुटका यासाठी सत्तेतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने केलेली आंदोलनेही हवेत विरल्याचा अनुभव मुंबईकरांना घ्यावा लागत आहे. पाच किलोमीटर त्रिज्येचा नियम लागू झाला असता तर मुलुंड, दहिसर, बोरिवली तसेच आसपासच्या परिसरातील रहिवाशांना टोलमुक्ती मिळू शकली असती. मात्र, तसे झालेले नाही.

कधीकाळी नोकरदार ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, पालघर या ठिकाणांहून मुंबईत कामधंद्यानिमित्त येत असे. परंतु झपाटय़ाने विस्तारत जाणाऱ्या मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे, नवी मुंबई यांसारख्या भागातही कामानिमित्ताने लाखोंच्या संख्येने मुंबईकरांची ये-जा सुरू असते. या भागात उभ्या राहिलेल्या लहानमोठय़ा उद्योगांमुळे मुंबईकरांना या शहरांचा प्रवास घडतो. तसेच मुंबईतून अहमदाबाद, नाशिक तसेच पुणे, गोवा महामार्गाच्या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही बरीच मोठी आहे. सुट्टीच्या काळात मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक महामार्गावर पर्यटकांच्या वाहनांचे जथ्थे दिसून येतात. मुंबईच्या वेशीवर उभारण्यात आलेल्या टोलच्या जाचातून मुक्ती मिळावी अशी या प्रवाशांची गेली अनेक वर्षांची मागणी आहे. मुंबई आणि नवी मुंबई शहरांच्या वेशीवर टोलनाके असून सर्वाधिक टोलनाके ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये येतात. आनंदनगर नाका, मॉडेला चेक नाका, घोडबंदर, भिवंडी-कशेळी, खारेगाव आणि मुंब्रा बाह्य़वळण असे टोल नाके ठाणे महापालिका क्षेत्रात येत होते. त्यापैकी खारेगाव आणि मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील टोलनाका बंद झाला तर मॉडेला चेक नाका, घोडबंदर या टोलनाक्यांवर कारला टोल सवलत देण्यात आली. मुलुंड, वाशी, ऐरोली, दहिसर अशा ठिकाणी मुंबईकरांना टोल भरून प्रवास करावा लागतो. यातून मुक्ती मिळावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मनसेनेही यावरून वातावरण तापवले. अजूनही टोल नाक्यांवरील रखडपट्टी सुरूच आहे.

शिवसेनेची टोलमुक्ती कागदाव

पाच वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात सत्तेवर असताना ठाणे जिल्ह्य़ाला टोलमुक्त करावे यासाठी शिवसेनेने आंदोलन केले होते. तसेच विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. या निवडणुकीनंतर शिवसेना सत्तेत सामील झाली. सत्तेतील पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला तरी मुंबई टोलमुक्त होऊ शकलेली नाही. ठाणे ते नवी मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आनंदनगर आणि ऐरोली या दोन टोलनाक्यांपैकी एकाच नाक्यावर टोल आकारावा यासाठी देखील शिवसेनेचे नेते आग्रही होते. सत्तेत सहभागी झाल्यानंतर ही मागणी मान्य करून घेण्यात पक्षाला यश आलेले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या काळात टोलनाका व्यवस्थापनांसोबत झालेल्या करारामुळे हे नियम अमलात आणता येत नाही अशी सारवासारव आता शिवसेनेला करावी लागत आहे. खारेगाव आणि मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील टोलनाके मुदत पूर्ण झाल्यामुळे बंद झाले आहेत, तर कशेळी, काटई, कोन, घोडबंदर चेना बंदर, मॉडेला चेकनाका या टोलनाक्यांवर कारला टोल सवलत देण्यात आली. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत मुंबई पूर्णपणे टोलमुक्त होऊ शकलेली नाही.

नैसर्गिक अधिवासांना संरक्षण द्या!’

आपल्याकडे विकासाच्या नावाखाली नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास होत आहे. नैसर्गिक अधिवासाकडे संपूर्ण जैवविविधतेच्या दृष्टीने पाहावे लागेल. त्यासाठी अशा अधिवासांना स्वतंत्रपणे संरक्षण देणे गरजेचे आहे. पाणथळ जागांचे सर्वेक्षण केल्यानंतर अनेक बाबी उघडकीस आल्या. आपण अजूनही पाणथळ जागांच्या संरक्षण-संवर्धनाबाबत मागेच आहोत.

शहरातील तलावांवर सर्रास भराव टाकणे, बुजवणे, प्रदूषित करण्याचे प्रकार सुरू असतात. त्यावर कडक उपाययोजना कराव्या लागतील. त्याचबरोबर प्लास्टिकच्या प्रश्नावर केवळ नियम, चर्चा होतात. ठोस उपाययोजना होत नाहीत. आयआयटीसारख्या संस्थांनी प्लास्टिकविरहित पॅकिंगसाठी संशोधन करण्याची गरज आहे.

पर्यावरणाबरोबरच शहरातील नागरिकांसाठी आत्पकालीन परिस्थितीबाबत काही ठोस गोष्टी कराव्या लागतील. आत्पकालीन परिस्थितीत काय करावे याचे प्रशिक्षण प्रगत राष्ट्रात सर्वच नागरिकांना, मुलांनादेखील दिले जाते. गेल्या काही वर्षांत आपल्या शहरात अनेक आत्पकालीन प्रसंग उद्भवले, पण नागरिकांना यावेळी नेमके कसा मार्ग काढावा याची माहिती नसते. अशी प्रशिक्षणं ही ‘लाइफ स्कील’ म्हणून ओळखली जातात. त्याचा आपल्याकडे पूर्ण अभाव आहे. – आनंद पेंढारकर, पर्यावरण व वन्यजीवतज्ज्ञ.

मुंबईतील टोलनाकेदहिसर, ऐरोली, वाशी, मुलुंडकारला सूट असलेले टोलनाकेकशेळी, काटई, कोन, घोडबंदर चेना बंदर, मॉडेला चेकनाकानव्याने सुरू होणारे टोलनाके

खारेगाव टोल नाका बंद करण्यात आला असला तरी या ठिकाणी आता नव्याने टोल नाका उभारला जाणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून त्यानंतर हा टोलनाका उभारला जाणार आहे.

राज्यातील पहिला टोल नाका म्हणून खारेगाव टोलनाका ओळखला जातो. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका १३ मे २०१७ रोजी बंद करण्यात आला. पंधरा वर्षांच्या कार्यकाळात या टोलनाक्यावर सुमारे ४९० ते ५१० कोटी रुपयांची टोलवसुली झाली, तर रस्ता बांधणी, देखभाल व दुरुस्तीवर गेल्या पंधरा वर्षांत १८० कोटी ८३ लाख रुपये इतका खर्च झाला होता. आयआरबी या कंपनीने या रस्त्याची बांधणी केली होती. त्या मोबदल्यात त्यांना रस्त्यावर टोलवसुलीची परवानगी देण्यात आली होती.

नव्याने होणारे टोलनाके

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका बंद झाल्यामुळे निर्धास्त झालेल्या वाहनचालकांना नव्याने निर्माण होणाऱ्या आठपदरी रस्त्यासाठी पुन्हा टोल भरावा लागणार आहे. वडपे-भिवंडी रस्त्याच्या आठ पदरीकरणाचे भूमिपूजन २४ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या मार्गिका पूर्ण झाल्यानंतर खारेगाव येथे पुन्हा टोलनाका सुरू करण्यात येणार आहे.

(कळते समजते)

कंठी, मोदक आणि केक..

भाजपचा पारंपरिक गड समजल्या जाणाऱ्या बोरिवलीत या वेळेसही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उमेदवारी मिळणार हे निश्चितच. इथल्या भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास इतका की, तावडे मतदारसंघात फिरकले नाहीत तरी निवडून येतील. पण तावडे गाफील नाहीत. बोरिवलीवर त्यांची घारीची नजर असते. त्यातून तावडेंची मतदारांशी संपर्कात राहण्याची आपली वेगळीच ‘स्टाइल’ आहे. बोरिवलीत ज्यांच्या ज्यांच्या घरी गणपती बसतो त्यांच्या घरी एक कंठी आणि मोदकांचा बॉक्स यंदाच्या गणेशोत्सवात भाजपच्या कार्यालयातून गेला होता. अशा आठ हजार जणांची यादी तयार करण्यात आली होती. बोरिवलीत कुणाच्या घरी निधन झाले की त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र भाजपचे कार्यकर्ते घरपोच आणून देतात. पुढे जाऊन दिवाळी, नाताळ, ईद अशा सणांच्या काळात दुखवटा असलेल्या घरांमध्ये आपल्या संस्कृतीला अनुसरून फराळ, केक असे गोडाधोडाचे पदार्थ पोहोचते केले जातात. बोरिवलीत संमिश्र वस्ती असली तरी येथील व्यापारी, नोकरदार, उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय भाजपच्या बाजूने आहेत. इथे मीटर, गटर, रस्ते हे विषय नाहीतच, अशी पक्षाची धारणा असल्याने मतदारांच्या संपर्कात राहण्याची पद्धतही बदलते. त्यात आता नवरात्र आल्याने तावडे इथल्या गुजराती भाषक वस्तीत गरब्यावर ताल धरताना दिसले तरी आश्चर्य वाटायला नको!