मुंबई : मढ येथील सिल्व्हर समुद्र किनाऱ्यावर ऑगस्टमध्ये जखमी अवस्थेत दुर्मिळ ‘लॉगहेड’ कासव आढळून आले होते. त्यामुळे त्याला तत्काळ ऐरोली येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याला फुप्फुसाचा दाह असल्याचे समजले. त्यानंतर एक महिना यशस्वी उपचार करून गुरूवारी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

मढ येथील सिल्व्हर किनाऱ्यावर १७ ऑगस्ट रोजी स्थानिक मच्छिमारांना मादी ‘लॉगहेड’ कासव आढळले होते. बराच वेळ हे दुर्मिळ कासव हालचाल करीत नसल्याने मच्छिमारांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस, कांदळवन कक्षाचे कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी कासवाला ऐरोलीतील केंद्रात दाखल केले. त्यानंतर तेथून या कासवाला डॉ. रिना देव यांच्या उपचार केंद्रात नेण्यात आले. ‘एक्स-रे’ काढल्यानंतर या कासवाला न्यूमोनिया झाल्याचे समजले. तसेच लहान बोटीच्या जोरदार धडकेने कासवाचे कवच तुटल्याचे निदर्शनास आले. कासवाच्या फुप्फुसाला संसर्ग झाला होता. त्यावर उपचार करण्यात आले. कासवाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला गुरुवारी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानकडून देण्यात आली.

कासव पूर्णपणे बरे झाले असून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. त्याची सामान्य नोंदणीसाठी ‘फ्लिपर टॅगिंग’ केली आहे, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा कांदळवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र तिवारी यांनी सांगितले.