डाव्या बाजूने वाहन चालवण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष

ठाणे : महामार्गावरील डाव्या बाजूच्या मार्गिकेवरूनच अवजड वाहन चालविण्याचा नियम मोडून महामार्गावरील सर्वच मार्गिका अवजड वाहनचालक अडवीत असल्याचे चित्र आहे. यामुळे हलक्या वाहनांना वाहतुकीसाठी मार्गिकाच उपलब्ध होत नसून संथगतीने चालणाऱ्या अवजड वाहनांमुळे त्यांची कोंडी होत आहे.

यामुळेच ठाणे तसेच आसपासच्या शहरांतील महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत. अवजड वाहनांच्या या बेशिस्त वाहतुकीमुळे मोठा अपघात होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील महामार्गासह अंतर्गत मार्गावर खड्डे पडले आहेत. पाऊस थांबत नसल्यामुळे खड्डे बुजविणे शक्य होत नसल्याचे दावे संबंधित यंत्रणांकडून केले जात आहेत. या खड्डय़ांमुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला असून ठिकठिकाणी कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यात भर म्हणून बंदी असलेल्या वेळेतही ठाणे शहरात अवजड वाहतूक सुरू आहे.  महामार्गाच्या डाव्या बाजूच्या मार्गिकेवरूनच केवळ अवजड वाहने चालविण्याचा आणि उर्वरित मार्गिका अन्य वाहनांसाठी खुल्या ठेवण्याचा नियम आहे. मात्र, हा नियम अवजड वाहनांचे चालक सरार्स पायदळी तुडवीत आहेत.

ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक आणि घोडबंदर भागातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. या महामार्गावर दुपारी आणि रात्रीच्या वेळेत अवजड वाहतुकीला परवानगी आहे. मात्र, त्याव्यतिरिक्त वेळेतही या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू असते. आधीच अवजड वाहनांची वाहतूक संथगती असताना खड्डय़ांमुळे त्यांचा वेग अधिकच मंदावला आहे. त्यांच्यामुळे अन्य वाहनांची रखडपट्टी सुरू असून हे चित्र तीन हात नाका, कॅडबरी, माजिवाडा आणि घोडबंदर भागातील महामार्गावर दिसून येत आहे. मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरही हाच प्रकार घडतो. मात्र, त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. यासंदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ठाणे तसेच घोडबंदर भागातील महामार्गावरील सर्वच मार्गिका अवजड वाहनांनी अडवल्या जातात. हे वाहनचालक रांगेने न जाता एकमेकांसोबत शर्यत लावत असल्यामुळे पुढे जाण्याच्या नादात सर्वच मार्गिकांवरून वाहतूक करतात. घोडबंदर येथील गायमुख भागातील चढणीच्या रस्त्यावरही या वाहनचालकांची शर्यत सुरू असते. याठिकाणी या वाहनांचा वेग मंदावतो आणि अतिशय धिम्यागतीने ही वाहने पुढे जातात. या शर्यतीदरम्यान चढणीवर एखादे अवज़ड वाहन बंद पडते आणि त्याच्या पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात आणि कासारवडवलीपर्यंत वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते.