मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या २० मे रोजी होत असून अखेरच्या टप्प्यातील प्रचारानिमित्त सर्वच उमेदवारांनी शनिवारी आपापल्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी प्रचार फेऱ्या काढल्या. परिणामी, मुंबईतील अनेक रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे केवळ वाहनचालकच नव्हे, तर पादचाऱ्यांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्यातील मतदान येत्या सोमवारी होत आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्रचार बंद झाला. तत्पूर्वी उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी शनिवारी सकाळी चेंबूरच्या पांजरापोळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आशीर्वाद यात्रा काढली होती. ही यात्रा चेंबूर – दादर शिवाजी पार्कदरम्यान काढण्यात आली होती. ही संपूर्ण यात्रा शीव-पनवेल रस्त्यावरून निघाल्याने रस्त्यांवरील वाहतुकीवरही परिणाम झाला. तसेच शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी सकाळी १० वाजता मेट्रो सिनेमापासून लालबाग, मेघवाडीपर्यंत बाईक रॅली काढली होती. या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता गोविंदा व राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा सहभागी झाले होते. त्यामुळे नागरिकांना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ईशान्य मुंबईमधील भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी सकाळी भांडुप येथील मंगतराम पेट्रोल पंप ते संपूर्ण भांडुप परिसरामध्ये रथावरून प्रचार केला. भांडुपमध्ये अनेक छोटेछोटे रस्ते असल्याने या रथयात्रेमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांचा शनिवारी सकाळी रंगशारदा येथून रोड शो काढण्यात आला होता. त्यामुळे एस. व्ही. रोडवर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

हेही वाचा >>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी वरळीत बॅनरबाजी; महापालिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

उत्तर मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांनी मालाड – बोरिवलीदरम्यान बाईक रॅली काढली होती. या रॅलीमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले सहभागी झाले होते. या रॅलीदरम्यान ठिकठिकाणी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पायधुनी – भुलेश्वरदरम्यानचा परिसर दाटीवाटीचा असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी बाईक रॅलीऐवजी पदयात्रा काढण्यास प्राधान्य दिले.

हेही वाचा >>> पसंतीच्या वाहन क्रमांकाच्या वितरणातून वडाळा आरटीओच्या तिजोरीत ३० लाख रुपये महसूल जमा

घाटकोपर दुर्घटनेमुळे बाईक रॅली रद्द केली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ईशान्य मुंबईतील उमेदवार संजय पाटील यांनी मुलुंड ते घाटकोपरपर्यंत बाईक रॅली काढण्याचे नियोजन केले होते. मात्र घाटकोपर दुर्घटनेमुळे त्यांनी ही रॅली रद्द केली. मतदारांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी मुलुंड, भांडुप व विक्रोळी परिसरामध्ये सकाळी प्रचार फेरी काढली होती.