वाहतूक पोलिसांची टपाल खात्याशी बोलणी सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतुकीचे नियम मोडून पसार होणाऱ्या वाहनचालकांच्या दारात दंडवसुलीसाठी पोस्टमन आल्याचे चित्र नजीकच्या काळात दिसू शकते. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना ईचलन पाठवणे तसेच त्यांच्याकडून दंडवसूल करणे ही कामे वाहतूक पोलिसांना मनुष्यबळाअभावी शक्य नसल्याने यासाठी आता टपाल खात्याची मदत घेण्याचा विचार सुरू झाला आहे. टपाल खात्याला अशा बेशिस्त वाहनचालकांची नावे व पत्ते कळवून या विभागामार्फतच दंडपावती व दंडवसुलीची कामे करवून घेण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बोलणी सुरू केली आहेत.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून आता ईचलन पद्धतीने दंड आकारला जातो. तसेच शहरातील विविध रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हींनी टिपलेली वाहतूक नियमभंगाची दृश्ये तपासून त्याआधारे संबंधित वाहनचालकांना घरी ईचलन पाठवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येतो; परंतु अपुरे मनुष्यबळ आणि वाहनचालकांचे चुकीचे पत्ते यामुळे ही कारवाई फारशी प्रभावी ठरलेली नाही. यावरच तोडगा म्हणून आता वाहतूक पोलिसांनी याकामी टपाल खात्याची मदत घेण्याचे ठरवले आहे.

प्रत्येक उपनगरात टपाल कार्यालय आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे पत्ते उपलब्ध करून दिल्यास टपाल खाते ईचलन आरोपींच्या घरी पोहोचवू शकेल. तसेच तिथल्या तिथे दंड वसूल करू शकेल. त्यामुळे वाहतूक पोलिसांवरला भार हलका होईल. दंड आकारण्यात आलेल्या चालकांची माहिती टपाल खात्याला इंटरनेटद्वारे पाठवली जाईल. त्यानंतर हा विभाग आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत दंडवसुली करील, अशी पोलिसांची योजना आहे. या कामासाठी टपाल खात्याला किती शुल्क द्यावे लागेल, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

विमा कंपन्यांकडूनही मदत

वाहतूक पोलीस वाहन क्रमांकाच्या आधारे वाहनचालकाच्या पत्त्यावर ईचलन पाठवतात. परंतु बहुतांश वेळा हे पत्ते चुकीचे वा बदललेले असतात. त्यामुळे विमा कंपन्या आणि अन्य यंत्रणांकडून शहरातील वाहनांच्या मालकांचे तपशील गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic rule breaking issue postman mumbai traffic police
First published on: 11-08-2017 at 03:01 IST