वाहनचालकांच्या खिशाला आणखी कात्री लावण्यासाठी सुरू झालेल्या खारघर येथील टोलनाक्यामुळे पहिल्याच दिवशी सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहतूक विभागाने कोणतेही नियोजन न केल्याने मंगळवारी सकाळी टोलनाक्यापासून एक किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या. याचा फटका मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांबरोबच ‘व्हीआयपीं’नाही बसला. त्यामुळे आता मुंबई-पुणे प्रवासाला जाताना खारघर व कामोठे येथे अर्धा तासाचा विलंब गृहीत धरून घरातून निघावे लागणार आहे.

‘एमएच ४६ व ०६’ नोंदणीच्या वाहनांना सूट
जोपर्यंत स्थानिक  वाहनचालकांना ईटीसी (तांत्रिक टोल कलेक्शन) टॅग पूर्णपणे देण्याचे काम होत नाही, तोपर्यंत ‘एमएच ४६’ व ‘एमएच ०६’ या नोंदणीच्या वाहनांना खारघर व कामोठे टोलनाक्यातून सवलतीचा प्रवास करता येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश आगवणे यांनी दिली.

नेमके किती कोटी?
२८ किमीचा आठपदरी काँक्रीटचा मार्ग बनविण्यासाठी १२२० कोटी रुपये खर्च एसपीटीपीएल कंपनीला आला होता, असे यापूर्वी सांगण्यात येत होते. मात्र सोमवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकात पाटील यांनी हा खर्च १७०० कोटी रुपये असल्याचे म्हटले. त्यामुळे ही ५०० कोटी रुपयांची वाढ ही जनतेच्या मुळावर बसते का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, वाढीव खर्चाचा भरुदड कंपनी सामान्य वाहनचालकांकडून वसूल करणार नाही. पुढील १४ वर्षे टोलवसूली सुरु राहणार आहे, असे सायन पनवेल टोल प्रा. लिमिटेड कंपनीचे प्रवक्ते उमेश सोनावणे यांनी सांगितले.