नोकऱ्यांसाठी लवकरच योजना; महिना सहा हजार रुपये विद्यावेतन

मुंबई : बँका, रेल्वे, पोलीस दल, सैन्य दल इत्यादी क्षेत्रांतील नोकऱ्यांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील ९० हजार युवक-युवतींना प्रशिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनामहिना सहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.

  स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांतील सेवेत प्रवेश मिळवावा लागतो. अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित युवक व युवतींना अशा स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करणे, त्याकरिता त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करून  प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.  त्यात बँकिंग, रेल्वे, आयुर्विमा (एलआयसी ), पोलीस दल, सैन्य दल इत्यादी क्षेत्रातील नोकरभरतीसाठी परीक्षांची पूर्वतयारी तयारी करून घेतली जाणार आहे. बार्टीच्या वतीने ही योजना राबविण्यात येणार आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना महिना सहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. पोलीस व सैन्य दलातील नोकरभरतीचे प्रशिक्षण चार महिन्यांचे असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यावेतनाशिवाय बूट व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरिता तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. वर्षाला १८ हजार याप्रमाणे पाच वर्षांत ९० हजार युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.