मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले. बदल्यांच्या आदेशाला १२ तास होण्यापूर्वीच पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती कशासाठी देण्यात आली याचा खुलासा करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच उपायुक्त दर्जाच्या ३९ जणांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी सायंकाळी जारी करण्यात आले. बदल्यांवरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील रुसवेफुगवे समोर आले. पाच उपायुक्तांना बढती देऊन त्यांची अप्पर पोलीस आयुक्त म्हणून नव्याने करण्यात आलेल्या नेमणुकीस गृह खात्याने एका आदेशान्वये स्थगिती दिली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर या बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी याबाबत शिंदे यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांना शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमधील मतभेदानंतर स्थगिती देण्यात आली होती. त्या दहा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वाद बराच गाजला होता. शेवटी शिवसेना व राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये चर्चा झाल्यावर त्या १० जणांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र त्या करताना मूळ आदेशात काही बदल करण्यात आले होते. या बदल्यांवरून गैरव्यवहारांचे आरोप झाले होते. आता पुन्हा पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमधील विसंवादानंतर स्थगिती देण्यात आली.

महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले व दत्तात्रय शिंदे यांना अपर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र माने यांची अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक परिमंडळ ठाणे, मीरा भाईंदरचे उपायुक्त महेश पाटील यांची अपर पोलीस आयुक्त (वाहतूक, मुंबई), महामार्ग सुरक्षा पथक, पुणे येथील अधीक्षक संजय जाधव यांची अपर पोलीस आयुक्त (प्रशासन, ठाणे), लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांची अपर पोलीस आयुक्त (सशस्त्र पोलीस, मुंबई), पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची अपर पोलीस आयुक्त (संरक्षण व सुरक्षा, मुंबई) येथे बदली करण्यात आली होती. अवघ्या १२ तासांत या पाच अधिकाऱ्यांच्या बढती व बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. हे सर्व अधिकारी सध्या ठाणे व आसपासच्या परिसरात सेवेत आहेत.

या बदल्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विश्वासात घेतले नसल्याची तक्रार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची चर्चा आहे. त्यानंतर या पाच अधिकाऱ्यांच्या बढती व बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रकरण सध्या गाजत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर बदल्यांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले व सध्या ते तुरुंगात आहेत. बदल्यांकरिता उच्चपदस्थांकडून दबाव आल्याचा जवाब तत्कालीन गृहसचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय यंत्रणांसमोर दिला होता. हे सारे महाविकास आघाडीवर शेकले असतानाही त्यातून गृहमंत्र्यांनी काही बोध घेतलेला दिसत नाही. मंत्र्यांच्या वैयक्तिक दबावाला मुख्यमंत्री, गृहमंत्री बळी कसे पडतात, असा सवाल केला जात आहे.

स्थगितीचे खरे कारण काय; फडणवीस यांचा सवाल 

नागपूर : राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले, मात्र नंतर अवघ्या १२ तासांत अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. यामागे नेमके कारण काय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.

फडणवीस बुधवारी सकाळी नागपुरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नंतर काही बदल्यांना दिलेली स्थगिती याबाबत विचारले असता ते म्हणाले, बदल्यांच्या आदेशला स्थगिती देण्यामागे नेमके कारण काय? ही प्रशासकीय चूक आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे. यापूर्वीसुद्धा दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या, नंतर तो वसुलीचा भाग होता हे लक्षात आले होते, तोच हा प्रकार आहे का? हे स्पष्ट व्हायला हवे.

मुंबईत भाजपच्या पोलखोल यात्रेच्या वाहनावर झालेल्या दगडफेक प्रकरणात दोषींना अजूनही अटक झाली नाही. ज्यांची पोलखोल होत आहे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे, त्यातून ते आमच्या रथावर हल्ले करत आहेत, पण यामुळे पोलखोल कार्यक्रम सुरूच राहणार आणि पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले तर आम्ही पोलिसांचीदेखील पोलखोल करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, नागपूरच्या मातीत आणि वातावरणात वेगळेपण आहे, खासदार संजय राऊत  नागपूरला वारंवार आल्यास त्यांना सद्बुद्धी येईल, असे फडणवीस म्हणाले.