परिवहन मंत्री-एसटी कर्मचारी संघटनांतील बैठक निष्फळ

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीतही एसटी संपाबाबत तोडगा निघू शकला नाही. ‘एसटी’च्या विलीनीकरणाचा मुद्दा समितीच्या अहवालानुसारच असेल, असे स्पष्ट करतानाच याबाबत महाधिवकत्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन परब यांनी बैठकीत दिले. त्यामुळे संपाचा तिढा कायम आहे.

संपाचा तिढा कायम असतानाच महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईही सुरूच ठेवली असून शनिवारी रोजंदारीवरील ३८० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली. या कारवाईनंतरही विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारी ठाम असून त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून आझाद मैदानात एसटीचे कर्मचारी कुटुंबियांसह दाखल झाले आहेत.

‘एसटी’च्या मुंबई सेन्ट्रल येथील मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब, एसटीचे वरिष्ठ अधिकारी, एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ, काही कर्मचारी तसेच अ‍ॅड्. सदावर्ते यांच्यात बैठक झाली.

विलीनीकरणाची मागणी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बैठकीत पुन्हा एकदा उचलून धरली. तसेच या विषयावर महाधिवक्त्यांशीही चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली. मात्र यावर न्यायालयाने समिती नेमली असून त्यांच्या अहवालानुसारच पुढे जाता येईल, असे परब यांनी स्पष्ट केले. महाधिवक्तांशीही चर्चा करू, पण कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. समितीचे काम वेळेत पूर्ण होईल, परंतु संप ताणू नका, तो मागे घ्या. सरकारची कोणतीही आडमुठी भूमिका नसल्याचे परब यांनी बैठकीत स्पष्ट केले. त्यावर शिष्टमंडळाने पुन्हा चर्चा करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत विलीनीकरण, कर्मचाऱ्यांचा वेतन करार यावर कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही.

दरम्यान, शनिवारी १४३ बस फेऱ्या धावल्या. यात ४६ शिवनेरी, ८३ शिवशाही आणि १४ साध्या बस चालवण्यात आल्या आणि त्यांतून ४,२८० प्रवाशांनी प्रवास केला.

राज्यातील कानाकोपऱ्यातून एसटीचे कर्मचारी शनिवारी कुटुंबियांसह मोठ्या प्रमाणात आझाद मैदानात दाखल झाले. त्यांची संख्या वाढल्याने आझाद मैदानात पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

३८० जणांची सेवासमाप्ती

कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी एसटी महामंडळ चर्चा करीत आहे, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांवर कारवाईही करीत आहे. रोजंदारीवरील ३८० कर्मचाऱ्यांवर शनिवारी सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. आतापर्यंत ६१८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. १६१ कायम कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने आता निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या २,९३७ झाली आहे.