गृहमंत्रालयाच्या आदेशाकडे महामंडळाचे बोट
राज्य परिवहन मंडळाच्या ‘शिवनेरी’तून अगदी आरामदायी प्रवास करण्याची तुमची इच्छा असली तरी यापुढे तुम्हाला प्रखर सूर्यप्रकाशाचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने बसगाडय़ांतील पडदे काढून टाकण्याबाबत दिलेल्या आदेशाची प्रादेशिक परिवहन विभागाने तत्परतेने कारवाई केल्यामुळे ‘शिवनेरी’तील पडदे गायब झाले आहेत. मोठय़ा काचांतून थेट येणारे उन्हाचे चटके सहन करतच ‘शिवनेरी’चा आनंददायी प्रवास करावा लागणार आहे.
वातानुकूलित ‘शिवनेरी’ हे मुंबई-पुणेवासीयांचे खास आकर्षण ठरले आहे. दुप्पट पैसे मोजून प्रवास करण्यास तयार असलेल्या प्रवाशांना व्होल्वो बसेस व आतील बाजूंनी लावलेले पडदे सर्वाना नेहमीच आकर्षणाचा विषय ठरलेले आहेत. पूर्ण प्रवासात बसच्या खिडकीचे सर्व पडदे लावून अनेकांना छानशी झोपही मिळत होती. पण आता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका आदेशान्वये हे सर्व पडदे हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी दादर-पुणे, ठाणे-पुणे, पुणे-बंगळुरू, पुणे-कोल्हापूर तसेच अनेक मार्गावर धावणाऱ्या सर्व शिवनेरी बसेसमधील आतील पडदे काढण्यात आले आहेत.
नवी दिल्लीमध्ये तरुणीवर धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर गृहखात्याने सर्व बसेसच्या काळ्या काचा आणि पडदे काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार येथील प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करीत अनेक बसेसना दंडही ठोठावला, पण शिवनेरीचे पडदे काढल्यामुळे मात्र त्याचा सर्वाधिक त्रास प्रवाशांनाच बसत आहे. मुळातच शिवनेरी बसेसच्या काचा या मोठय़ा असल्याने सूर्यप्रकाशही आत जादा प्रमाणात येतो. या काचा लवकर गरमही होतात. त्यामुळे सूर्यप्रकाश ज्या दिशेने येईल त्या बाजूच्या सर्व प्रवाशांना प्रखर सूर्यप्रकाशाचे चटके सहन करावे लागत आहेत. याबाबत अनेक प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही दुप्पट पैसे मोजून प्रवास करतो आणि आता या प्रवासात असे चटके कशासाठी देत आहात, असा खडा सवाल पुणे येथील विभावरी कुलकर्णी या वृद्धेने उपस्थित केला. दिल्लीमध्ये झालेला प्रकार हा निषेधार्हच आहे, पण शासन अंगीकृत महामंडळाच्या ‘शिवनेरी’मधील पडदेच काढून टाकण्याचा निर्णय बरोबर नसल्याचेही अनेक प्रवाशांनी सांगितले.
या बाबत महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रताप सावंत यांनी सांगितले की, महामंडळाला आलेल्या आदेशान्वये हे पडदे काढण्यात आले असून आम्ही कायद्याचे पालन करण्यास बांधील आहोत. दरम्यान हे पडदे पूर्ववत न लावल्यास सर्व प्रवाशांची सह्य़ांची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे या बसेसने नेहमी प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2012 रोजी प्रकाशित
थंडगार हवेत चटके खात करा ‘शिवनेरी’चा प्रवास!
गृहमंत्रालयाच्या आदेशाकडे महामंडळाचे बोट राज्य परिवहन मंडळाच्या ‘शिवनेरी’तून अगदी आरामदायी प्रवास करण्याची तुमची इच्छा असली तरी यापुढे तुम्हाला प्रखर सूर्यप्रकाशाचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने बसगाडय़ांतील पडदे काढून टाकण्याबाबत दिलेल्या आदेशाची प्रादेशिक परिवहन विभागाने तत्परतेने कारवाई केल्यामुळे ‘शिवनेरी’तील पडदे गायब झाले आहेत. मोठय़ा काचांतून थेट येणारे उन्हाचे चटके सहन करतच ‘शिवनेरी’चा आनंददायी प्रवास करावा लागणार आहे.

First published on: 26-12-2012 at 05:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel of shivneri in winterfull air