करोना कृतिदलाचे ‘माझा डॉक्टरां’ना मार्गदर्शन

मुंबई : लक्षणांनुसार रुग्णांचे योग्य वर्गीकरण झाल्यास वेळेत योग्य उपचार करणे शक्य होते. अनाठायी, अनावश्यक उपचार करू नका आणि करोनातून बरे झालेल्या रुग्णांवरही बारकाईने लक्ष ठेवा, असा सल्ला ‘माझा डॉक्टर’ या उपक्रमात कृतिदलाच्या तज्ज्ञांनी डॉक्टरांना दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘माझा डॉक्टर’ संकल्पनेतून रविवारी राज्यभरातील डॉक्टरांसाठी दूरचित्रसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कृतिदलाचे प्रमुख डॉ. संजय ओक, डॉ. राहुल पंडित, डॉ. शशांक जोशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. आशिष भूमकर यांनी राज्यातील सुमारे २२ हजार फॅमिली फिजिशियन आणि वैद्यकीय चिकित्सकांना मार्गदर्शन केले.

‘रुग्ण प्रथम त्यांच्या डॉक्टरकडे (फॅमिली डॉक्टर) जातात. रुग्णांना करोनासदृश्य कोणतीही लक्षणे असल्यास तातडीने ‘आरटीपीसीआर’ चाचणी करून घेणे गरजेचे आहे. सिटी स्कॅनमध्ये फुफ्फुसांवर परिणाम झाल्याचे दिसत असले तरी संसर्गाची तीव्रता धोकादायक आहे असे नाही. त्यामुळे सिटीस्कॅन ही निदान करणारी चाचणी नाही. ‘आरटीपीसीआर’ला पर्याय नाही. गृहविलगीकरणातील रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनी नियमितपणे फोन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधावा, अशी सूचना डॉ. ओक यांनी केली. तसेच रुग्णाला पहिल्या आठवडय़ात फारसा त्रास होत नाही, परंतु दुसऱ्या आठवडय़ात त्याची लक्षणे तीव्र होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी गृहविलगीकरणातील रुग्णांवर देखरेख ठेवणे गरजेचे आहे’, असे डॉ. ओक यांनी सांगितले.

कोणत्या रुग्णांला घरीच उपचार द्यावेत, कोणत्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे, कोणत्या रुग्णांची स्थिती धोक्याच्या पातळीवर आहे असे वर्गीकरण करताना लक्षणे काय आहेत, हे पाहावे. कोणताही अन्य जीवाणूजन्य संसर्ग नसल्यास कोणत्याही प्रतिजैविकांचा वापर करू नये. गृहविलगीकरणातील रुग्णांवर स्टिरॉईडचा वापर करू नये. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि रक्तद्रव उपचार करू नयेत. यामुळे कोणताही फायदा होत नसल्याचे दिसून आले आहे. रुग्णाला लक्षणे आल्यावर तीन दिवसांत रक्तद्रव उपचार करावे लागतात. या काळात रुग्ण घरीच असतो. त्यामुळे हे उपचार फायदेशीर नसून नियमावलीतूनही कृतीदलाने काढून टाकले आहेत, असे डॉ. शशांक जोशी यांनी स्पष्ट केले.

प्राणवायू आणि औषधांचा योग्य वापर

रेमडेसिवीर हे विषाणूच्या वाढीचा वेग कमी करते. त्यामुळे हे औषध बाधा झाल्यावर पहिल्या दहा दिवसांत देणे गरजेचे आहे. टोसिलीझुम्ॉबचा वापर आवश्यकता असेल तरच करावा. रुग्ण अतिदक्षता विभागात ४८ तास असल्यास त्यानंतर या औषधांचा वापर करून फायदा होत नाही. याबाबत कृतिदलाने तयार केलेल्या नियमावलीनुसारच उपचार करा. अनावश्यक आणि अनाठायी औषधांचा वापर करू नका. प्राणवायूचा काटेकोरपणे वापर करा. रुग्णाला अधिक काळ पालथे झोपवा जेणेकरून प्राणवायू देण्याची आवश्यकता कमी भासेल. स्टिरॉईडचीही कमी प्रमाणातील मात्रा द्या, असे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

योग्य निदान करून वेळेत शस्त्रक्रिया

करोनातून बरे झालेल्या आणि साखरेची अनियंत्रित पातळी असलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका अधिक असून, त्याचे वेळेत निदान होणे आवश्यक आहे. शस्त्रक्रिया आणि औषधे दिल्यास १०० टक्के हा आजार बरा होतो. या शस्त्रक्रिया कशा कराव्यात हे दाखविले जाईल. प्राणवायू देण्यासाठी रुग्णाला लावलेल्या नळ्या, पाणी यामधूनही संसर्ग होण्याची शक्यता असते. निर्जंतुकीकरण करून याचा वापर करावा, अशी सूचना डॉ. भूमकर यांनी केली.

गृहविलगीकरणाबाबत योग्य व्यवस्थापन हवे

मुंबई : सुमारे ७५ टक्के रुग्णांना करोनाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. ते घरीच विलगीकरणात राहतात. मात्र, काही रुग्ण काही कालावधीनंतर गंभीर होतात आणि उशिरा रुग्णालयांत दाखल झाल्याने दगावतात. हे रोखण्यासाठी गृहविलगीकरणातील रुग्णांचे उत्तम व्यवस्थापन आवश्यक आहे. त्यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.