चित्रकला, हस्तकला आणि बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंची विक्री

आदिवासी कलाकार आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट ग्राहक आणि मुंबईची बाजारपेठ मिळावी यासाठी यंदा मुंबईत सुरू असलेल्या काळा घोडा महोत्सवात पहिल्यांदाच आदिवासी कलाकार, स्वयंसाहाय्यता महिला गट यांना थेट सहभागी करून घेण्यात आले आहे. डहाणू, जव्हार, पालघर येथील तरुण आदिवासी कलाकार आपली कला येथे सादर करून महोत्सवाला भेट देणाऱ्या देशी आणि परदेशी पाहुण्यांचेही लक्ष वेधून घेत आहेत. स्वयंसाहाय्यता महिला गटाच्या स्टॉलवरील चरख्यावरील सुतकताई हे विशेष आकर्षण ठरले आहे. खादी आणि बांबूच्या वस्तू तयार करणाऱ्या कारागीरांनीही आपली कला सादर केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या पुढाकाराने आणि कार्यालयातील ‘सहभाग’ सामाजिक उत्तरदायित्व कक्षाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. उपक्रमातून महोत्सवात विविध आदिवासी कलाकार, महिला बचत आणि स्वयंसेवी गट यांना स्टॉल देण्यात आले आहेत.

आदिवासींची चित्रकला ‘वारली चित्रकला’ म्हणून ओळखली जाते. महोत्सवातील एका स्टॉलवर या आदिवासी वारली चित्रकलेची प्रात्यक्षिके, तयार केलेल्या चित्रांची विक्री, कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या विविध वस्तू, प्राण्यांचे मुखवटे आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

अनोखा चरखा

राज्य शासनाच्या खादी आणि ग्रामीण उद्योग मंडळाच्या अमरावती विभागातून येथे आलेले मंगेश बेलतणक म्हणाले, येथे आम्ही लाकडी चरख्यावर सुतकताईचे प्रात्यक्षिक दाखवीत असून ते पाहण्यासाठी खूप गर्दी होत आहे. घडी घालता येणारा चरखाही येथे असून घडी घातल्यानंतर याचा आकार पुस्तकाएवढा होत असल्याने त्याला पुस्तक चरखा असेही म्हणतात. काळा घोडा महोत्सव येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

दीड लाखांची विक्री

महोत्सवाला दररोज हजारो लोक भेट देत असतात. यात सर्वच  वयोगटातील लोकांचा सहभाग असून आपल्या भारतीय लोकांसह काही परदेशी नागरिकही येथे येत आहेत. आदिवासी वारली शैलीतील चित्रे, बांबूपासून तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू, कापडावर रेखाटलेली चित्रे, कागदाच्या लगद्यापासून तयार केलेले प्राण्यांचे मुखवटे आदी सर्व वस्तूंना चांगली मागणी असून येणारी लोक विविध प्रश्न विचारून या कलेबद्दल आमच्याकडून माहिती घेत आहेत. महोत्सवात आत्तापर्यंत सुमारे दीड लाख रुपयांची विक्री झाल्याचेही मुकेश धानप म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्य़ाच्या विविध आदिवासी भागांतून आम्ही काही कलाकार या महोत्सवात आमची कला घेऊन पहिल्यांदाच थेट सहभागी झालो आहोत. आम्ही आदिवासी कलाकार मेहनत घेऊन विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार करतो. आमच्या या वस्तू आणि आमच्या कलेचे प्रात्यक्षिक देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या महानगरात आम्हाला थेट सादर करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे.

मुकेश धानप, पालघर