scorecardresearch

तिहेरी बॉम्बस्फोट खटल्याची दैनंदिन सुनावणी अशक्य; विशेष न्यायालयाकडून सरकारी पक्षाची मागणी अमान्य 

जुन्या व विशिष्ट कालावधीत खटला निकाली काढण्यास सांगण्यात आलेल्या प्रकरणांचा ताण असल्याचे स्पष्ट करून झवेरी बाजार, दादर व ऑपेरा हाऊस येथे २०११ मध्ये झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्याची सरकारी पक्षाची मागणी विशेष मोक्का न्यायालयाने फेटाळली.

court
( संग्रहित छायचित्र )

मुंबई : जुन्या व विशिष्ट कालावधीत खटला निकाली काढण्यास सांगण्यात आलेल्या प्रकरणांचा ताण असल्याचे स्पष्ट करून झवेरी बाजार, दादर व ऑपेरा हाऊस येथे २०११ मध्ये झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्याची सरकारी पक्षाची मागणी विशेष मोक्का न्यायालयाने फेटाळली. त्याच वेळी खटल्याचे कामकाज प्रभावीपणे चालवण्यासाठी सरकारी पक्षाकडून कोणतेही ठोस प्रयत्न करण्यात येत नसल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.

खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्याची विनंती करणारा अर्ज सरकारी वकिलांनी विशेष न्यायालयात केला होता. त्यावरील सुनावणीच्या वेळी जुन्या व विशिष्ट कालावधीत खटला निकाली काढण्यास सांगण्यात आलेल्या प्रकरणांचा ताण असल्याचे सांगून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी तिहेरी बॉम्बस्फोट खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यास नकार दिला. एवढय़ावरच न थांबता, सरकारी पक्षाचा अर्ज लक्षात घेता प्रत्येकजण स्वत:ची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

आपल्या आधीच्या न्यायाधीशांनीही या खटल्यात जलदगतीने साक्षीपुरावे नोंदवण्याची गरज बोलून दाखवल्याकडे लक्ष वेधून खटला पुढे नेण्यासाठी सरकारी पक्षाकडून कोणतेही ठोस प्रयत्न करण्यात आले नसल्याचे दिसून येते, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले. त्याच वेळी खटला जलदगतीने चालविण्याचे आदेश देताना अन्य प्रकरणांच्या ताणामुळे खटल्याची दररोज सुनावणी घेणे शक्य नाही. त्यामुळे सरकारी पक्षाची मागणी मान्य करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

घटना काय? अकरा वर्षांपूर्वी १३  जुलै २०११ रोजी ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर कबूतरखान्याजवळील बस स्टॉपवर बॉम्बस्फोट झाले होते, त्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. तर, १३० जण जखमी झाले होते. जानेवारी २०१२ मध्ये ‘एटीएस’ने नकी अहमद, नदीम अख्तर, कंवरनैन पाथरेजा आणि हारून रशीद नाईक या चार जणांना कटात सहभागी असल्याच्या आरोपांतर्गत अटक केली होती. पोलिसांच्या आरोपानुसार, फरारी आरोपी यासीन भटकळ हा या तिहेरी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार होता. त्याने दिल्लीहून मुंबईला नकीकडे स्फोटके पाठवली. ती त्याने चोरलेल्या दुचाकीमध्ये ठेवली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Triple blast case impossible government party special court invalid ysh