शिवसेनेचा आंदोलन करण्याचा इशारा
दादरमधील गोखले रोड (उत्तर) येथे पुनर्विकासाच्या माध्यमातून आकारास येत असलेल्या टोलेजंग इमारतीचे दोन मजले अनधिकृतपणे बांधण्यात आले असून ते पाडण्याऐवजी अधिकृत करण्यासाठी काही राजकीय मंडळी आणि पालिका अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. मजले पाडण्याची नोटीस देऊन तब्बल एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला, तरी कारवाई होत नसल्यामुळे याविरुद्ध रणशिंग फुंकण्याची वेळ सत्ताधारी शिवसेनेवर आली आहे.
दादरमधील गोखले रोड (उत्तर) येथील डी. के. ठाकूर हॉलसमोरील भिकोबा निवास या चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. चाळीच्या जागी सध्या नऊ मजली इमारत उभी राहिली आहे. या इमारतीच्या मंजूर आराखडय़ापेक्षा दोन जादा मजले बांधण्यात आल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे अनधिकृत असलेला आठवा आणि नववा मजला तोडून टाकावा, अशी नोटीस पालिकेने ५ डिसेंबर २०११ रोजी विकासकावर बजावली होती. तसेच ४ फेब्रुवारी २०१२ रोजी पुन्हा नोटीस पाठविण्यात आली. मात्र विकास नियंत्रण नियमावली २९९१ मधील अधिनियम ३३(१५) अन्वये पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर झाला असल्याची बतावणी विकासकाकडून करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागामध्ये तसा प्रस्तावच सादर करण्यात आलेला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या इमारतीवरील अनधिकृत मजले पाडून टाकावेत, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख सदा सरवणकर यांनी केली आहे.भिकोबा निवासच्या जागी उभ्या राहिलेल्या इमारतीवरील अनधिकृत मजले पाडून टाकण्याऐवजी निरनिराळ्या नियमांचा आधार घेऊन ते अधिकृत करून घेण्याचा प्रयत्न विकासक करीत असून काही राजकीय पक्षांचे नेते आणि पालिका अधिकाऱ्यांचा विकासकाला आशीर्वाद आहे, असा आरोप सदा सरवणकर यांनी केला.