संक्रांत जवळ येऊ लागली की तिळगूळ, गूळपोळी, उंधियो असे एरव्ही वर्षभर न बनवले जाणारे तिखट-गोड पदार्थ घरोघरी केले जातात. यात वापरल्या जाणाऱ्या साहित्यापैकीच काही जिन्नस वापरून खास संक्रांतीसाठी तयार केला जाणारा पण फारसा माहीत नसलेला एक पदार्थ म्हणजे कोनफळाचे गोडवणी. यात कोनफळ हे कंद, गूळ, खोबरं, केळं इत्यादीचे चविष्ट मिश्रण आहे. हा पदार्थ नेहमीच्या गोड पदार्थापेक्षा थोडासा हटके आहे..
कृती : कोनफळ (पांढरे किंवा जांभळे) साल काढून उकडवून घ्या. त्याचे तुकडे करा. पॅनमध्ये कोनफळ घाला. त्यात केळ्याचे तुकडे, किसलेलं खोबरं आणि गूळ घाला. या मिश्रणात ४-५ वाटय़ा पाणी घालून उकळी काढा. उकळी येईपर्यंत तांदळाचे पीठ थोडय़ा पाण्यात कालवून तयार ठेवा. उकळी आल्यानंतर त्यात पीठ टाका. त्यात वेलची पूड टाकून एकजीव होईपर्यंत शिजू द्या. कंदमूळ, गूळ, खोबरं आणि केळ्याच्या मिश्रणामुळे हा पदार्थ पौष्टिक तर होतोच शिवाय सर्व वयोगटांतील आणि प्रकृतीच्या व्यक्ती त्याचा आस्वाद घेऊ शकतात.
साहित्य : पाव किलो कोनफळ, २ हिरव्या सालाची पिकलेली केळी, १ नारळ किसून, २ चमचे तांदळाचं पीठ, १ चमचा वेलची पूड, गूळ २-३ वाटय़ा.