मुंबई : अंधेरी परिसरात ॲम्बरग्रीस (व्हेलच्या उलटी) विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी मंगळवारी दोघांना अटक केली. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी सुमारे एक किलो ॲम्बरग्रीस जप्त केले असून त्याची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक आहे. दोन आरोपींपैकी एक जण रत्नागिरी जिल्ह्यातील असून इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतले आहे. दोन आरोपींनी व्हेल माशाची उलटी कोठून मिळवली याबाबत पोलीस तपास करत आहेत. व्हेल माशाच्या उलटीला परदेशात प्रचंड मागणी आहे. अत्तर बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याची किंमत कोट्यावधी रुपये असून त्याची बेकायदेशिररित्या विक्री केली जाते. रुपेश राम पवार (३५) आणि प्रविण्य प्रदीप काळे (२६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पवार हा रत्नागिरीचा, तर काळे हा माहीम कोळीवाडा येथील आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकरणाऱ्या पिता – पुत्राला अटक

मेघवाडी पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी कक्षाचे (एटीसी) पोलीस शिपाई  प्रवीण सैंदाणे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोघांना अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश पालवे आणि वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीची योग्य पडताळणी केल्यानंतर निरीक्षक साळुंखे, उपनिरीक्षक बबलू गुसिंगे, सैंदाणे आदींचा समावेश असलेले पोलीस पथक अंधेरी (पूर्व) येथील शेर – ए – पंजाब वसाहतीत पोहोचले. दोन्ही संशयित घटनास्थळी आल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यात  एक किलो वजनाची व्हेल माशाची उलटी सापडली. तपासणीसाठी ती न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. ती उलटी विकण्यासाठी ते तेथे आल्याचे दोघांनी कबुल केले. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या व्हेल माशाच्या उलटीची किंमत एक कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवार हा अभियंता असून सध्या नोकरी नसल्यामुळे उपजीविकेसाठी टपरी चालवत असल्याचे त्याने सांगितले.  झटपट पैसे कमवण्यासाठी तो ॲम्बरग्रीसची बेकायदेशीरपणे विक्री करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली. जप्त केलेली व्हेल माशाची उलटी आरोपींनी  कोठून मिळवली, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे.  पोलिसांनी दोन्ही आरोपींना वन्यजीव संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested including highly qualified youth in whale vomit case mumbai print news zws