तीन गावठी बॉम्ब हस्तगत, घातपाती कारवायांचा प्रयत्न

जळगावच्या साकळी भागातून राज्य दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेल्या दोन कट्टरपंथीयांकडून तीन गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आले. लीलाधर लोधी ऊर्फ विजय ऊर्फ भैय्या लंबू आणि वासुदेव सूर्यवंशी ऊर्फ मेकॅनिक अशी त्यांची नावे आहेत.

या दोघांनी जळगावसह नाशिकमध्ये घातपाती कारवाया तसेच हत्या करण्यासाठी भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींची सविस्तर माहिती गोळा केल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून उघडकीस आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी त्यांना १७ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अटकेत असलेल्या शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार या कट्टरपथीयांच्या चौकशीतून या दोघांची नावे उघड झाली होती. ‘एटीएस’च्या नाशिक पथकाने ६ सप्टेंबर रोजी साकळीत छापा टाकला. लोधीच्या घरात तीन गावठी बॉम्ब सापडले. दोघांकडून पाच भ्रमणध्वनी, चार पेन ड्राइव्ह, एक डीव्हीडी, वाहनांच्या दोन नंबरप्लेट, पाच छोटय़ा डायऱ्या असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींकडून ‘एटीएस’ने दोन गाडय़ा आणि सहा मोटारसायकल जप्त केल्या असून ही सर्व वाहने चोरीची आहेत. या वाहनांचा वापर घातपाती कारवायांची तयारी आणि भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींची इत्थंभूत माहिती गोळा करण्यासाठी केला जात असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह अन्य विचारवंतांच्या हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांनी प्रामुख्याने मोटारसायकलचाच वापर केला होता. एटीएसने गोंधळेकरकडून जळगाव जिल्ह्य़ाचा रंगीत नकाशाही जप्त केला होता.

लोधी आणि सूर्यवंशीला रविवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. ‘एटीएस’ने त्यांच्यासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. या दोघांच्या जळगाव-नाशिकमधील नेमक्या हालचाली, हस्तगत केलेल्या गावठी बॉम्बचा स्रोत, अटकेत असलेल्या आरोपींशी संबंध याबाबतचा तपास करण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे ‘एटीएस’तर्फे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी आरोपींच्यावतीने युक्तिवाद करताना, ६ सप्टेंबरपासून आरोपी ‘एटीएस’च्या ताब्यात आहेत. त्यांना कुठे ठेवले होते? कोणा समक्ष विचारपूस केली? याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी केली. तसेच ताब्यात घेतल्यापासून तीन दिवस पोलीस कोठडी समजण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली.