मुंबई महानगर प्रदेश विभागात अकरावीसाठी असलेल्या एक लाख ४९ हजार ८०८ जागांसाठी दोन लाख १९ हजार ७६० अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा भिवंडी आणि पालघर या विभागाला वगळण्यात आले असून उर्वरित ठिकाणी ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन प्रणालीतून होणार आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांचे अर्ज मान्य होणे बाकी होते.

ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू राहणार असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. अर्ज भरल्यानंतर आता २० जून रोजी सामान्य गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. यानंतर २१ आणि २२ जून रोजी विद्यार्थ्यांना अर्जात काही त्रूटी असतील तर त्या दूर करण्याची संधी मिळणार आहे. यानंतर २७ जूनला पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.

जागांच्या तुलनेत अर्जदार विद्यार्थ्यांची संख्या जास्त असली तरी अद्याप पॉलिटेक्निक आणि आयटीआयची प्रवेश प्रक्रिया होणे बाकी असल्यामुळे काही विद्यार्थी तेथे जाण्याची शक्यता असल्यामुळे कोणीही विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.