ठाणे येथील उपवन भागात शनिवारी रात्री मित्राच्या मदतीने मोटारसायकल शिकत असलेल्या एका अल्पवयीन युवतीने रस्त्यावरून जाणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाला उडविले. या अपघातात त्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर युवतीसह तिचा मित्रही जखमी झाला आहे.
 या अपघातप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात युवती आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोघेही रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.  
किशोर संतोष पाडेकर (१३), असे अपघातात मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो ठाण्यातील कोकणीपाडा भागात राहत होता. शितल श्रीरंग जाधव (१५, रा. कोपरी), असे यातील युवतीचे तर राहुल शंकर पाटील (रा. वैतीवाडी) असे तिच्या मित्राचे नाव आहे.  शनिवारी रात्री कोकणीपाडा ते उपवन तलाव परिरसरामध्ये शितल मोटारसायकल चालविण्यासाठी शिकत होती. तसेच राहुल पाठीमागे बसून तिला मोटारसायकल चालविण्यासाठी शिकवित होता. त्यावेळी किशोर आणि त्याचा मित्र रोहन भोये हे दोघे रस्त्यावरून पायी जात असताना शितल हिने किशोरला मोटारसायकलने उडविले. या अपघातात जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले.  तसेच या अपघातामध्ये शितल आणि तिचा मित्र राहुल हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.