या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदींबरोबर एका व्यासपीठावर बोलावण्यास भाजप नेते नाखूश

मुंबईत पुढील महिन्यात साजऱ्या होणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्धाटन व अन्य कार्यक्रमांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दूर राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या उद्धाटन समारंभात ठाकरे यांना व्यासपीठावर निमंत्रित करण्याबाबत पेच असल्याने अद्याप निर्णय झालेला नाही. पण पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या ठाकरे यांना त्यांच्या बरोबर एका व्यासपीठावर आमंत्रित करण्यास भाजप अनुकूल नाही. या सप्ताहाचा मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या निमित्ताने वातावरण निर्मिती करण्यासाठी लाभ उठविण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.

‘मेक इन इंडिया’ सप्ताह १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व अन्य मान्यवरांना राज्य सरकारने आमंत्रणे पाठविली आहेत. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा भाजपने राजकीय लाभासाठी वापर केला. भाजप-शिवसेना युती सरकार असताना त्यावेळीही मोदी यांच्याबरोबर एका व्यासपीठावर ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. प्रसिद्धिमाध्यमांमध्ये त्यावरून वाद निर्माण झाल्यावर निमंत्रण पाठविले गेले. पण ठाकरे यांनी उपस्थित राहण्याचे नाकारले.

मुंबईतील महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजपला त्याचा राजकीय लाभ होणार आहे. त्यामुळे शिवसेनेला फारशी संधी न देता ठाकरे यांनाही कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा भाजपमधील उच्चपदस्थांचा विचार आहे.  सप्ताहाचे एक निमंत्रण ऐनवेळी पाठविले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मेक इन इंडियाही शासकीय कार्यक्रम असल्याने राजशिष्टाचारानुसार ठाकरे यांचा व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांच्या यादीत समावेश नाही.  सप्ताहातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची विनंती त्यांना केली जाण्याची शक्यता आहे. पण योग्य व्यक्तींकडून निमंत्रण न आल्यास ठाकरे या सप्ताहापासून दूरच राहणे पसंत करतील, असे सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray keep out from make in india program
First published on: 15-01-2016 at 03:59 IST