पोलिसांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पोलीस पत्नींना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आरोपींवर कारवाई केली पाहिजे, असे सांगितले. त्याचबरोबर सर्वच खात्यांचे मंत्री व्यवस्थित काम सांभाळणार असतील, तर आम्हाला काहीच अडचण नाही. आम्ही हौस म्हणून गृह खाते स्वतंत्र व्यक्तीकडे देण्याची मागणी केलेली नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पोलिसांना चांगल्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळाले पाहिजेत, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, कल्याणमध्ये मंगळवारी घडलेली घटना निंदनीय आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. मंत्री व्यवस्थितपणे काम सांभाळणार असतील, तर आम्हाला काहीच अडचण नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
सर्वांना कायद्याचा धाक असला पाहिजे. पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना, हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. प्रत्येक नागरिकाने पोलिसांना आपल्या कुटुंबातील एक व्यक्तीच मानायला हवे. पोलिसांची सुरक्षितता, कायद्याची अंमलबजावणी, हल्लेखोरांना कठोर शिक्षा, अशा अनेक मागण्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या.
गणपती विसर्जनावेळी पोलीस उपनिरीक्षकाला पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न कल्याणमध्ये करण्यात आला. कल्याण येथील तिसगाव नाका परिसरात गणपती विसर्जन सुरू असताना रात्री नऊच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या कार्यकर्त्यांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray meets devendra fadnavis at varsha bunglow in mumbai
First published on: 07-09-2016 at 11:49 IST