कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील विखारी टीका, सत्तेत असूनही कामे होत नसल्याची सेना आमदारांची खंत, तर मंत्र्यांनाच विश्वासात घेतले जात नसल्याचे मंत्र्यांचे गाऱ्हाणे लक्षात घेऊन जनतेची कामे व्हावीत यासाठी कटुता टाळून दिवाळीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
राज्यात सत्तेत असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत, तर मंत्र्यांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातच व्यक्त केली होती. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सेना-भाजपने एकमेकांवर जोरदार टीका केली होती. या दरम्यान सेनाभवनात शिवसेना आमदारांच्या आयोजित केलेल्या बैठकीत राज्यात सरकारमध्ये असूनही कामे होत नसल्याची तक्रार बहुतेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. गेल्या वर्षभरात सरकारमध्ये असूनही सेना-भाजपमध्ये सातत्याने दुरावाच राहिला होता. एकमेकांवर टीकेचे आसूड ओढण्याची एकही संधी दोन्ही पक्षांचे नेते सोडत नव्हते. पाकिस्तानी कलाकार तसेच खेळाडूंना सेनेने केलेला विरोध एकीकडे, तर पाक कलावंतांना संरक्षण देण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका दुसरीकडे. हे कमी म्हणून सेनेच्या मंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती, एवढेच नव्हे तर हवे असल्यास सरकारमधून तुम्ही बाहेर पडा, असे आवाहन सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते.
हा वाढता दुरावा दोन्ही पक्षांसाठी मारक असून पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या दहा महापालिका निवडणुकीत याचा फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो हे बिहारच्या निवडणुकीने दाखवून दिले. राज्यातील ग्रामपंचायती व नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीलाही भरपूर जागा मिळाल्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या दहा पालिकांच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमधील कटुता संपणे आवश्यक असल्याचे दोन्ही पक्षांतील नेत्यांना वाटत असले, तरी पुढाकार कोणी घ्यायचा हा कळीचा प्रश्न होता.
या पाश्र्वभूमीवर कटुता सोडून समन्वयाची भूमिका घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला असून, दिवाळीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची ते भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना आमदारांच्या कामांची यादी घेऊनच उद्धव भेटणार असल्यामुळे सेना-भाजपतील कटुताही यातून संपेल, असा विश्वास सेनेच्या सूत्रांनी व्यक्त केला.