राज्याला आर्थिक मदतीची मागणी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी नवी दिल्ली दौऱ्यावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून केंद्र सरकारने शहरातील पायाभूत सुविधा विकासासाठी विशेष आर्थिक मदत द्यावी, यासह राज्याला काही बाबींमध्ये आर्थिक मदत करण्याची विनंती मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांकडे करणार आहेत. राज्यातील महत्वाचे प्रश्न आणि आर्थिक मदतीविषयी या भेटीत चर्चा होईल, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी ‘ लोकसत्ता ‘ ला दिली.
मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी शुक्रवारी दुसऱ्यांदा भेट होणार आहे. याआधी पंतप्रधान महाराष्ट्रात आले असताना ठाकरे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली होती. राज्याच्या हिताच्या दृष्टीने महत्वाच्या बाबी आणि आर्थिक मदतीविषयी ठाकरे पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी भेटणार आहेत. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही मदत द्यावी, अनुत्पादक कर्जासाठी आर्थिक तरतूद करणे बँकांवर बंधनकारक असल्याने कर्जमाफी योजनेत बँकांनी अधिकचा वाटा घ्यावा, याबाबत निर्देश देण्याची विनंती पंतप्रधानांना करण्यात येणार आहे.
वस्तू व सेवा कर (जीएसटी) अनुदान, केंद्र-राज्य योजनांमध्ये केंद्राचा हिस्सा यापोटीचा निधी थकित आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी,यासह काही मुद्दय़ांवर चर्चा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री या नात्याने ही भेट असून त्यात राजकीय चर्चा होणार नसल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यात चर्चा होण्याचीही शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर ठाकरे व सोनिया गांधी यांची भेट झालेली नाही.