पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब   ल्ल काँग्रेसचा मात्र विरोध
महालक्ष्मी रेसकोर्सवरील पालिकेचा भूखंड ताब्यात घेऊन त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान आणि थीमपार्क उभारण्यावर पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र एवढय़ा मोठय़ा उद्यानाची देखभाल आणि सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसने त्यास कडाडून विरोध केला.
रेसकोर्सवरील ८,५५,१९८ चौरस मीटर भूखंड रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाडेपट्टय़ाने देण्यात आला आहे. त्यापैकी २,५८,२४५ चौरस मीटर जागा पालिकेच्या मालकीची आहे. उर्वरित ५,९६,९५३ चौरस मीटर जागा राज्य सरकारची आहे.
रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भाडेपट्टय़ाची मुदत ३१ मे रोजी संपुष्टात येत आहे. टर्फ क्लबला आणखी मुदतवाढ न देता हा भूखंड ताब्यात घेण्याची मागणी करणारे पत्र महापौर सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पाठविले
होते.
महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत सभागृह नेते यशोधर फणसे यांनी पालिकेच्या मालकीची जागा ताब्यात घेऊन तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान आणि थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास सर्व नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. पालिका आयुक्त सीताराम कुंटे हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविणार असल्याची माहिती फणसे यांनी दिली. मात्र इतक्या मोठय़ा जागेवर उभारण्यात येणाऱ्या उद्यानाचे संरक्षण आणि देखभाल कशी करणार, असा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसकडून विरोध करण्यात
आला.
दरम्यान, परवानगी न घेताच रेसकोर्सवर गैलोप रेस्टॉरंट, अधिकाऱ्यांसाठी वसाहत, ऑलिव्ह हॉटेल, एआरसी क्लब हाऊस आदींचे बांधकाम करण्यात आल्याबद्दल पालिकेने टर्फ क्लबवर नोटीस बजावली होती. तेव्हापासूनच रेसकोर्सचा प्रश्न वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पालिकेतील राजकीय पक्षांनी रेसकोर्सचा भूखंड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्याने आता राज्य सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.