चौथ्यांदा मुदतवाढ देऊनही काम न करणाऱ्या ठेकेदाराला अखेर हटवले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : नायगाव खाडीवरील पुलाचे काम २०१४मध्ये सुरू होऊनही अद्याप पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराचा कूर्मगती कारभार, तांत्रिक अडचणी यांमुळे या पुलाचे काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे. चार वेळा या कामासाठी ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली तरी काम पूर्ण न झाल्याने ठेकेदाराला हटवण्यात आले आहे. या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे, नाहीतर नायगावमधील शेकडो नागरिकांना जीव मुठीत धरून जुन्या पुलावरून ये-जा करावी लागणार आहे.

नायगाव पूर्वेला सोपारा खाडी आहे. पूर्वेकडील नागरिकांना पश्चिमेकडे तसेच रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी ही खाडी ओलांडून जावे लागते. या खाडीवर असलेल्या जुन्या लोखंडी पुलावरून नायगाव पूर्वेकडील नागरिक ये-जा करत असतात. तोच त्यांचा एकमेव मार्ग आहे. मात्र सध्या हा पूल जर्जर झाला असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.

या खाडीवर नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विविध कारणांमुळे तो सतत प्रलंबित राहत आहे. २०१४मध्ये  या कामाच्या निविदा काढून कार्यादेश काढण्यात आला होता. या पुलाचे काम मे. अजयपाल मंगल अ‍ॅण्ड कंपनी या ठेकेदाराकडे सोपवले होते. मात्र चार वेळा मुदतवाढ मिळवूनही ठेकेदार काम करू शकलेला नाही. ५ कोटी २० लाख रुपये खर्चाचा हा पूल मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र तो पूर्ण न झाल्याने दुसऱ्यांदा मुदतवाढ देत डिसेंबर २०१६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर मे २०१७ पर्यंत तिसरी मुदतवाढ देण्यात आली होती. या वेळी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. नायगाव खाडी पूल आणि नायगाव उड्डाण पूल या दोन्ही पुलांच्या एकाच मार्गाने अडथळा निर्माण झाल्याने दोन्ही पुलांचे काम रखडले होते.  सार्वजनिक बांधकाम खाते आणि एमएमआरडीए यांच्यात समन्वय नसल्याने या दोन्ही पुलांचे मार्ग एकमेकाना छेदत होते. या खाडीतून जलवाहतूक सुरू करायची असल्याने मेरिटाइम बोर्डाने पुलाची उंची ६ मीटर करण्यास सांगितले होते. त्यामुळे ही अडचण निर्माण झाली होती. वाढलेल्या उंचीमुळे पुलाचा उतार हा नव्याने तयार होणाऱ्या एमएमआरडीएच्या उड्डाण पुलाच्या मार्गातून जाणार होता. यासंदर्भात एमएमआरडीए आणि सार्वजिनक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी)  प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जागेची पाहणी केली असता खाडी पुलाच्या बांधकाम संरचनेत बदल करण्याचा मार्ग शोधण्यात आला आहे. मात्र या कामी १ कोटी १ लाख ७४ हजारांच्या निधीची गरज भासणार आहे. पालिकेने हा भार उचलत निधी दिला. त्या वेळी हे काम एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याने दिले होते.

सर्व अडचणी दूर झाल्या तरी पुलाचे काम रखडलेलेच आहे. यामुळे अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याने ठेकेदाराला हटवून नव्या ठेकेदाराची नियुक्ती केली आहे.

पावसाळ्यात कसोटी

पावसाळ्यात जुन्या पुलावरून जाणे अत्यंत धोकादायक ठरणार आहे. तोपर्यंत नवीन पूल बांधून पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे नव्या पुलाचे काम पूर्ण करवून घेण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याची कसोटी लागणार आहे.

मुदतवाढ

* मार्च २०१६

*  डिसेंबर २०१६

* मे २०१७

* एप्रिल २०१८

ठेकेदाराला हटवून नवीन ठेकदारामार्फत काम करवून घेत आहोत. आता हे काम आम्ही १५ जूनपर्यंत पूर्ण करू. जुन्या ठेकेदाराने विहित मुदतीत काम पूर्ण न केल्याने त्याला प्रतिदिन ५ हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्तावही सादर केला आहे.

– राजेंद्र जगदाळे,  कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncertainty over naigaon flyover construction work
First published on: 09-05-2018 at 03:02 IST