मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात आणि कोणत्याही परिस्थितीत पात्र शेतकऱ्यांना आठ दिवसांत विम्याचे पैसे द्यावेत, असे आदेश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी विमा कं पन्यांना दिले.

 अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके  वाया गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. मात्र पीक विम्याचे पैसे देण्यात कंपन्या टाळाटाळ करीत आहेत. त्याविरोधात काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी भाजप आमदार संजय कु टे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात आंदोलन केले होते. त्याची दखल घेत कृषिमंत्री भुसे यांनी विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीक विम्याचे पैसे वेळेत देण्याची सूचना केली.

 अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात असताना विमा कंपन्या मात्र त्यांची अडवणूक आणि फसवणूकही करीत असल्याचा आरोप या वेळी लोकप्रतिनिधींनी केला. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम २०२० मधील बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची ६४ कोटी ५९ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. अशाच प्रकारे राज्यभरातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांनी थकविल्याचे या वेळी कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यावर थकीत रक्कम पात्र शेतकऱ्यांना तातडीने देण्याचे आदेश भुसे यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले. त्यावर येत्या ८ दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी या वेळी दिली.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे, हे पंचनामे तातडीने करावेत. सोयाबीन पीक काढण्याच्या अवस्थेत असल्यामुळे पंचनामे करण्याच्या वेळी पीक उपलब्ध नाही या कारणामुळे विमा दावे अपात्र ठरवू नका, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.