नागपाडा, वांद्रे येथे उद्यानाखाली वाहनतळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा जोतिबा फुले मंडईजवळ भूमिगत वाहनतळ बांधण्याचा प्रयोग फसल्यानंतर महापालिकेने पुन्हा एकदा भूमिगत वाहनतळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नागपाडय़ातील झुला मदान आणि वांद्रे येथील पटवर्धन मैदानाखाली ही भूमिगत वाहनतळे बांधण्यात येणार असून तिथे एक हजारांहून अधिक चारचाकी वाहने उभी करता येणार आहेत.

मुंबईत भूमिगत वाहनतळ बांधणे ही फारच खर्चीक बाब आहे. फुले मंडईजवळ वाहनतळ बांधण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. परंतु ते कंत्राट रद्द करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा पालिकेने भूमिगत वाहनतळाकरिता निविदा मागविल्या आहेत.

मुंबईत वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहनतळांची संख्या अपुरी पडत आहे. अनेक वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. त्यावर उपाय म्हणून भूमिगत वाहनतळांची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी मैदानांच्या खाली भूमिगत वाहनतळ बांधण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. त्यानंतर महापालिकेने या शक्यतेचा विचार करता येईल असे म्हटले होते. आता हा विचार प्रत्यक्षात आला आहे.

सपाचे नगरसेवक रईस शेख यांनी नागपाडय़ातील झुला मैदानात भूमिगत वाहनतळ बांधण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने झुला मैदानासह वांद्रे येथील रावसाहेब पटवर्धन मैदानाखाली भूमिगत वाहनतळ बांधण्यासाठी दोन्ही विभागांच्या सहायक आयुक्तांना शक्यता तपासून पाहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानंतर वास्तुविशारद हाफीझ कॉन्ट्रॅक्टर यांची नियुक्ती करून दोन्ही ठिकाणच्या वाहनतळांचे आराखडे तयार करण्यात आले. आता इमारत बांधकाम विभागाच्या वतीने या दोन्ही भूमिगत वाहनतळांसाठी निविदा मागवण्यात आली आहे. रावसाहेब पटवर्धन उद्यानाखालील वाहनतळासाठी काही प्रमाणात झाडे कापावी लागणार असल्याने स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडून थोडाफार विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने ते पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधीही प्रयत्नशील आहेत. झुला मैदानातील वाहनतळासाठी सपाचे महापालिका गटनेते रईस शेख तर रावसाहेब पटवर्धन मैदानाखालील वाहनतळासाठी भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार आणि स्थानिक नगरसेविका स्वप्ना म्हात्रे प्रयत्नशील आहेत. यासाठी दोन्ही ठिकाणच्या लोकप्रतिनिधींचा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.

गुंडाळलेला प्रकल्प

सन २०११-१२ मध्ये महात्मा जोतिबा फुले मंडईजवळ भूमिगत वाहनतळ बनवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याच्या नातेवाईकाला कंत्राट देण्यात येणार होते. परंतु सर्व स्तरांतून याला झालेला विरोध आणि त्यासाठी होणारा खर्च पाहता महापालिकेने भूमिगत वाहनतळाचा प्रस्ताव गुंडाळला होता. परंतु पुन्हा एकदा भूमिगत वाहनतळासाठी महापालिकेने निविदा मागवल्या असून हा प्रयोग यशस्वी ठरतोय का, याकडेच सर्वाचे लक्ष आहे.

  • झुला मैदानातील वाहनांची संख्या : ५०३
  • चारचाकी वाहने : १९९
  • दुचाकी वाहने : ३०४
  • अंदाजित खर्च : ५६ कोटी रुपये
  • पटवर्धन मैदानातील वाहनांची संख्या : ५६०
  • चारचाकी वाहने : ३३९
  • दुचाकी वाहने : २२१
  • अंदाजित खर्च : ८७ कोटी रुपये
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Underground parking in mumbai
First published on: 13-11-2018 at 04:01 IST