भागवत कराड यांचे पंतप्रधानांकडूनही कौतुक

मुंबई: दिल्ली-मुंबई विमान प्रवासादरम्यान रक्तदाब कमी झाल्याने अस्वस्थ झालेल्या एका प्रवाशाच्या मदतीला विमानातून प्रवास करणारी विशेष महत्त्वाची व्यक्ती धावून गेली आणि त्या रुग्णावर तात्काळ उपचार झाले. . प्रसंगावधान दाखवून उपचार करणारी ही विशेष महत्त्वाची व्यक्ती होती, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड.

कराड सोमवारी दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या इंडिगोच्या विमानाने प्रवास करत होते. अचानक कराड यांच्या मागील आसनावर बसलेली व्यक्ती रक्तदाब कमी झाल्याने अस्वस्थ झाली. विमान कर्मचाऱ्यांनी उद्घोषणा करत प्रवाशांमध्ये कुणी डॉक्टर असल्यास मदतीकरिता पुढे येण्याचे आवाहन केले. त्यावर व्यवसायाने बालरोग शल्यचिकित्सक असलेले भागवत कराड तात्काळ पुढे झाले. त्यांनी त्या प्रवाशाला प्रथमोपचार देत त्याचा जीव वाचवला.

इंडिगोने एका ट्वीटद्वारे या घटनेची माहिती देत कराड यांचे आभार मानले. हे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनीही कराड यांचे मदत करतानाचे छायाचित्र ट्वीट करत कराड यांची जाहीर पाठ थोपटली. ‘आम्ही आपले ऋणी आहोत. कर्तव्याबद्दल नेहमीच दक्ष असणाऱ्या या केंद्रीय राज्यमंत्र्याचे आम्ही कौतुक करतो. डॉक्टर कराड यांनी एका प्रवाशाला मदत करण्यासाठी स्वत:हून दाखवलेली तयारी ही खरोखरच प्रेरणादायी आहे,’’ असे इंडिगोने ट्वीटमध्ये म्हटले आहे. तर ‘‘ते मनाने कायमच डॉक्टर आहेत. माझे सहकारी डॉ. भागवत कराड यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे,’’ असे म्हणत पंतप्रधानांनी आपल्या सहकार्याची पाठ थोपटली.

तुम्ही दाखवलेल्या ‘सेवा आणि समर्पण’ या मार्गावरूनच मी जनतेची सेवा करत आहे, असे उत्तर देत कराड यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

या प्रवाशाचा रक्तदाब कमी झाल्याने त्याला फार घाम येत होता. डॉ. कराड यांनी त्याच्यावर तातडीचे उपचार केले व ग्लुकोज दिल्यानंतर काही मिनिटांनी त्याची प्रकृती स्थिर झाली.