मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी सह्याद्री अतिथिगृह येथे भेट घेऊन चर्चा केली. राणे यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची सूचना दिल्याच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मतदारसंघातून उद्याोगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात फलकही लावले आहेत. हा युतीच्या जागावाटपात शिवसेनेचा मतदारसंघ असल्याने तो आपल्याला मिळावा, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. पण भाजपने हे अमान्य केले असून राणे यांना निवडणुकीत उतरविण्याचे ठरविले आहे.

हेही वाचा >>> Breaking : शरद पवार गटाला अखेर चिन्ह मिळालं, निवडणूक आयोगाचं ‘या’ चिन्हावर शिक्कामोर्तब!

राणे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यातही मतभेद आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविताना सामंत, केसरकर यांच्यासह शिंदे गटातील नेत्यांचे सहकार्य राणे यांना लागणार आहे. या दृष्टीने राणे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याचे समजते.

शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा

राज्यातील महाविकास आघाडीतील जागावाटपावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली असून तीन पक्षांच्या आघाडीतील लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा गुंता लवकरच सुटणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे- पाटील यांचा शरद पवारांशी काहीही संबंध नाही. त्यावर भाष्य करण्याची गरज नसल्याचे जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister narayan rane meets cm eknath shinde over ratnagiri sindhudurg lok sabha election zws