डान्सबार मालकांची अनोखी शक्कल, चक्क रिसॉर्टमध्ये सुरू केला डान्सबार!

विरार पोलिसांच्या कारवाईत बारबालांसह ३१ जणांवर कारवाई

याप्रकरणी रिसॉर्ट मालकावरही गुन्हे दाखल केले, असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चक्क वसईतील एका रिसॉर्टमध्येच डान्सबार तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. विरार पोलिसांनी याप्रकरणी चांदीप येथील मॉस नावाच्या रिसॉर्टवर गुरूवारी रात्री छापा टाकून १५ मुलींसह, ग्राहक आणि हॉटेलच्या कर्मचार्‍यांना अटक केली आहे. रिसॉर्टमध्ये अशाप्रकारे डान्सबार सुरू करण्याची ही पहिलीच घटना आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यातील ऑर्केस्ट्रा बार बंद झाले आहेत. त्यामुळे डान्सबार मालकाने अनोखी शक्कल लढवत रिसॉर्टमध्येच डान्स बार सुरू करण्याचे ठरवले. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चांदीप गावाजवळ असलेल्या मॉस या रिसॉर्टमध्ये हा डान्स बार सुरू करण्यात आला होता. गेल्या ३-४ दिवसांपासून हा रिसॉर्टमधला डान्स बार छुप्या पध्दतीने सुरू होता आणि त्यात मोठ्याप्रमाणावर ग्राहक येत होते. याची कुणकूण विरार पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी गुरूवारी रात्री सापळा लावून कारवाई केली. या कारवाईत एकूण ३१ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात १५ बारबाला, ६ ग्राहक आणि हॉटेलचा व्यवस्थापक आणि कर्मचार्‍यांचा समावेश आहे. काशिमिरा येथील बॉसी नावाच्या डान्सबार मालक सचिन दांडगे याने हा बार सुरू केल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रफु्ल्ल वाघ यांनी दिली.

अटक केलेल्या आरोपींना गुरूवारी दुपारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्यावर विविध कलमांसह आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रिसॉर्ट मालकावरही गुन्हे दाखल केले, असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रिसॉर्टमध्ये अशाप्रकारे डान्सबार सुरू असल्याची ही पहिलीच घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Unique trick of dance bar owners dance bar started in the resort msr

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या