संयुक्त राष्ट्राचे पथक व स्थानिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम
मुंबईतील प्रदूषित सागरी किनारे आता पालिकेऐवजी स्थानिकांनी स्वच्छ करण्याचा निर्धार केला आहे. वर्सोव्यातील स्थानिक रहिवाशांच्या संघटेनेने गेले अनेक महिने हे वर्सोवा किनारा स्वच्छतेचे कार्य आरंभले आहे. विशेष म्हणजे, राज्य आणि केंद्र सरकारच्या ‘बंद’ कानांवर ही वार्ता अद्याप पोहोचली नसली तरी, संयुक्त राष्ट्रांपर्यंत मात्र ही परिस्थिती पोहोचली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे सागरी स्वच्छता विभागाचे सदिच्छादूत लुईस पघ यांच्या पथकाने व स्थानिक रहिवाशांनी गेले दोन दिवस येथे स्वच्छता मोहीम राबवून वसरेवा किनारपट्टी लख्ख केली.
मुंबईतील सर्व सागरी किनारे प्लास्टिक पिशव्या व अन्य प्रकारच्या कचऱ्याने पूर्ण भरून गेले आहेत. नदी, नाले, खाडय़ांमार्फत समुद्रात गेलेला कचरा हा भरतीच्या काळात किनाऱ्यांवर येऊन साठत असून त्याचा सागरी जिवांना तडाखा बसत आहे. याबाबत ‘लोकसत्ता मुंबई’मध्ये १५ जुलैला वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. अखेर आता किनाऱ्यांलगत राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी हा कचरा हटवण्यासाठी पुढाकार घेतला असून यात ‘वर्सोव्याचे स्थानिक कार्यकर्ते’ ही संघटना आघाडीवर आहे. संघटनेचे अध्यक्ष आफ्रोज शहा यांनी प्रथम दोन कार्यकर्त्यांसह या मोहिमेला सुरुवात केली होती. मात्र, आता त्यात दोनशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले असून गेले ४३ आठवडे हे कार्यकर्ते दर शनिवार-रविवारी वर्सोवा किनाऱ्याच्या स्वच्छतेचे काम करतात. यात दिग्दर्शक सुभाष घई यांची व्हिसलिंग वूड्स, वर्सोवा चिल्ड्रन वेल्फेअर स्कूल, ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन तसेच स्थानिक कोळी नागरिक आदी संस्था यात सहभागी होतात. या कामाबद्दल माहिती मिळताच या कचऱ्याच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांच्या पथकाने या कामात सहभागी होण्याची इच्छा आफ्रोज शहा यांच्याकडे व्यक्त केली होती. संयुक्त राष्ट्रांचे सागरी सदिच्छादूत लुईस पघ यांनी व त्यांच्या पथकाने या सफाई मोहिमेला ६ व ७ ऑगस्टला हजेरी लावत किनाऱ्यावरील कचरा हटवण्यास सुरुवात केली. या वेळी पालिकेने पुरवलेल्या डम्परमार्फत पाचशे कार्यकर्त्यांनी जमवलेला कचरा देवनार कचराभूमीवर टाकण्यात आला. या वेळी मोहिमेत सहभागी झालेले स्थानिक कोळी नागरिकांचे प्रतिनिधी मनीष भुनवले म्हणाले की, आमच्या जाळ्यात मासे कमी आणि कचराच जास्त मिळतो. त्यामुळे आमच्या उपजीविकेचे एकमेव साधन आता नामशेष होत असल्याची भीती आहे. म्हणूनच खारीचा वाटा म्हणून या उपक्रमाला आम्ही हातभार लावत आहोत. सुरुवातीला दोन जणांच्या उपक्रमातून सुरू झालेल्या या मोहिमेला आज शेकडो लोकांचा प्रतिसाद लाभत आहे. दर आठवडय़ाच्या शेवटी आम्ही कचरा साफ करतो. गेले ४३ आठवडे ही मोहीम सुरू असून आम्ही आजवर यातून २६ लाख किलो कचरा हटवला आहे. लुईस यांनी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे स्वत येऊन येथे सफाई केली असून त्यांनी काही खाडय़ांची पाहणी केली, असे शहा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही जगातली सगळ्यात मोठी सफाई मोहीम होती. कचऱ्याची मोठी समस्या असून मुंबईतील या कचऱ्याच्या समस्येबाबत आम्ही संयुक्त राष्ट्र संघात अहवाल सादर करणार आहोत.
– लूईस पघ, संयुक्त राष्ट्रांचे सागरी सदिच्छादूत

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: United nation and local residents started versova beach cleaning work
First published on: 09-08-2016 at 01:41 IST