मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या तिघांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यातून महाविकास आघाडीच्या एकजुटीचा संदेश देत राज्यसभेच्या चारही जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार गुरुवारी अर्ज दाखल करतील असे जाहीर करण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळीच सक्तवसुली संचालनालयाने शिवसेनेचे नेते व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांचे घर- सरकारी निवासस्थानावर छापे मारण्यास सुरुवात केली. या कारवाईचे सावट दुपारच्या अर्ज दाखल करण्याच्या उत्साहावर पडणार का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र जाहीर केल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी संजय राऊत आणि संजय पवार विधिमंडळात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आवर्जून उपस्थित राहत महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि भाजपच्या दबावात येणार नाही, असा संदेश दिला. या वेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आदी नेतेमंडळीही उपस्थित होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत आणि संजय पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेत जाणार याची मला खात्री आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. राज्यसभेच्या सहा जागांपैकी आमच्या आघाडीचे चार उमेदवार नक्कीच विजयी होतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

राऊत यांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ

मुंबई: राज्यात भाजपला सत्तेपासून रोखून महाविकास आघाडीला सत्तेवर आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेत गेल्या सहा वर्षांत सुमारे साडे चार कोटींनी वाढ झाली आहे. वार्षिक उत्पन्नात मात्र घट झाल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार राऊत दांपत्याची एकूण मालमत्ता सन २०१६च्या १४ कोटी २१ लाख रूपयांवरून यंदा १८ कोटी ६९ लाख अशी वाढली आहे. दरम्यन, शिवसेना आणि संभाजी राजे छत्रपती यांच्यातील संघर्षांतून खासदारकीची लॉटरी लागलेले कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांची एक कोटी तीन लाखाची जंगम तर दोन कोटी ५९ लाखाची स्थावर अशी तीन कोटी ७५ लाखांची मालमत्ता आहे. पवार यांना  जमाव जमवून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक वर्षांची शिक्षा झाली असून सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.