scorecardresearch

अवकाळी पाऊस व गारपीटीचा १९ जिल्हय़ांना फटका

मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पाऊस व गारपीटीचा १९ जिल्हय़ांना फटका
५१० गावांमधील सुमारे ४६ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे.

१०२ तालुक्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित

राज्यात गेल्या आठवडय़ात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे १९ जिल्ह्य़ातील सुमारे १०२ तालुक्यांमधील तीन हजार ७२४ गावांमधील तीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा व रब्बी हंगामामधील फळपिकांना गारपीटीचा सर्वाधिक फटका बसल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शनिवारी सांगितले.

अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्य़ास बसला असून त्यातील ५१० गावांमधील सुमारे ४६ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ बुलढाणा जिल्ह्य़ात ३३० गावांतील  ४१ हजार हेक्टर तर जालना जिल्ह्य़ातील ३२ हजार हेक्टरचा समावेश आहे

गारपीटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे सुरू आहेत. बाधित १९ जिल्ह्य़ामध्ये बीड, जालना, परभणी, नांदेड, जळगाव, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश असल्याचे फुंडकर यांनी सांगितले.

नुकसानाची जिल्हा, तालुका, गावनिहाय माहिती अशी (कंसात बाधित हेक्टरची संख्या) : बीड- माजलगाव, गेवराई, शिरुर- ४२ गावे (१० हजार ६३२), जालना- जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड- १७५ (३२ हजार), परभणी- सेलू व जिंतूर- २३- (आठ हजार ५७९), जळगाव- जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर- ३८ (दोन हजार ४४५), बुलढाणा- चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा- ३३० (४० हजार ३८५) अमरावती- मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजणगाव सुरजी व चिखलदरा- ५१० (४५ हजार ८६८), अकोला-मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार- १०१ (चार हजार ३६०) वाशिम- रिसोड व मालेगाव- ३११ (२६ हजार २८७), लातूर- लातूर, रेणापूर, उद्गीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगा, शि. अनंतपाळ- ३०८ (१६ हजार ३६१) उस्मानाबाद- उमरगा व उस्मानाबाद- १२२ (३० हजार ११२), हिंगोली- सेनगाव व औढा-३९ (१३९३), नांदेड- नायगाव, बीलोली,

माहूर, किनवट, हदगाव, धर्माबाद- ३२७ (२९ हजार ५३५), यवतमाळ- १० तालुके- २७६ (१३ हजार २६८), आतापर्यंत एकूण तीन हजार ७२४ गावातील दोन लाख ९० हजार ३९५ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अजूनही पंचनामे सुरू आहेत. बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-02-2018 at 04:43 IST

संबंधित बातम्या