नाटय़ परिषदेची माहिती; पहिले ‘बालनाटय़ संमेलन’ सोलापुरात
९६वे अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये ठाण्यात होत असल्याची माहिती नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सोमवारी दिली. तर पहिले अखिल भारतीय बालनाटय़ संमेलन २६ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत सोलापूर येथे होत असल्याचे नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी सांगितले.
पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवडय़ात ते होणार असल्याचेही जोशी म्हणाले. या पत्रकार परिषदेस नाटय़ परिषदेचे कोषाध्यक्षा लता नार्वेकर, बालनाटय़ संमेलनाच्या निमंत्रक समितीचे प्रमुख भाऊसाहेब भोईर उपस्थित होते. मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव आणि व्यासपीठ मिळावे, बालनाटय़ विषयाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा व्हावी या उद्देशाने हे बालनाटय़ संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या चार दिवसांच्या संमेलनात पहिले दोन दिवस सोलापूर येथील स्थानिक कलावंताचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
करंजीकर म्हणाले, संमेलनाचा मुख्य उद्घाटन सोहळा २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. बालनाटय़ चळवळ आणि मतिमंद मुलांसाठी नाटय़ प्रशिक्षण उपक्रम राबविणाऱ्या कांचन सोनटक्के या संमेलानाध्यक्षा असून आमदार प्रणिती शिंदे स्वागताध्यक्षा आहेत. उद्घाटन सोहळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे, उद्घाटक म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे तर अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षा व फैय्याज अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘संगीत शारदा’तील प्रवेश, पदे
संमेलनाच्या निमित्ताने बालनाटय़ दिंडीचेही आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात परिसंवाद, एकांकिका, चर्चासत्र, विशेष मुलांचे कार्यक्रम, ‘संगीत शारदा’ या नाटकातील काही प्रवेशआणि पदे, प्रकट मुलाखत, एकपात्री कार्यक्रम, तबला वादन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाचा समारोप ९६व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे निजोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर आणि राज्याचे सहकार व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकात पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.