सुरक्षेसह हजारोंच्या आरोग्याचीही रक्षणकर्ती

करोनाच्या पहिल्या लाटेत पोलीस दलात करोना संसर्ग बऱ्यापैकी फोफावला होता.

|| जयेश शिरसाट

मुंबईतील महिला पोलिसाचे करोना रुग्णांसाठी मोलाचे योगदान

मुंबई : पोलीस म्हणजे भ्रष्ट, भावनाशून्य असा साधारण समज असला, तरी करोनाकाळात कित्येक सहृदयी पोलिसांनी समाजभान जपत नागरिकांची सेवा केली. मुंबईतील सशस्त्र दलात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या रेहाना शेख यांनी मात्र गेल्या सव्वा वर्षात आपल्या कामासह राज्यभरातील हजारो करोनारुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना औषधांपासून सर्व प्रकारची मदत मिळवून देत सेवाव्रताचा नवा आदर्श समोर ठेवला आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत पोलीस दलात करोना संसर्ग बऱ्यापैकी फोफावला होता. याच काळात एका अडलेल्या सहकाऱ्याने त्यांच्याकडे आपल्या वृद्ध आईसाठी रक्तद्रव (प्लाझ्मा) उपलब्ध करून देण्याची विनंती के ली. रेहाना शेख यांचा दांडगा जनसंपर्क आणि मदतीला धावून जाण्याचा स्वभाव यांतून तातडीने या सहकाऱ्याच्या आईला प्लाझ्मा मिळाला. त्यानंतर शेख यांनी करोना रुग्ण आणि त्यांच्या हतबल नातेवाईकांना लागणारी मदत मिळवून देण्याचा चंग बांधला. बाधितांना रेमडेसिविर, टोसिलीझुमॅब आदी औषधे, खाट, प्लाझ्मा, रक्त उपलब्ध करून देण्यासाठी रेहाना यांनी आपला जनसंपर्क कामी आणला. आपली नोकरी, संसार आणि दुर्धर आजाराने ग्रासलेल्या बहिणीची शुश्रूषा या सर्व आघाड्यांवर पुरून त्यांनी समाजसेवेचा हा गाडा अविरत सुरू ठेवला. राज्यातील विविध भागांतून त्यांचा फोन चोवीस तास मदतीसाठी खणखणू लागला आणि गरजूंना मदत मिळेस्तोवर त्यांच्यासाठी रेहाना शेख झटत राहिल्या.

मुंबई पोलिसांनी सुरू के लेल्या कोव्हिड कक्षातूनही रेहाना यांना विनंत्या येऊ लागल्या. गेल्या वर्षभरात किती जणांना मदत केली, असे त्यांना विचारल्यावर ‘मोजायला कुणाला वेळ आहे? सव्वा वर्षातील व्हॉट्सअ‍ॅप नोंदी त्यासाठी पहाव्या लागतील’, असे त्या म्हणाल्या. अनेकांना मदत करता आली. पण ज्यांना करू शकले नाही, किंवा उपचारात उशीर झाला, त्याबाबत दु:ख वाटते, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस दलातील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या साहाय्यकाच्या आईला टोसिलीझुमॅब आवश्यक होते. ते शहरात कोठेच उपलब्ध नव्हते. सर्व पर्याय जवळपास संपल्याने अखेर त्यांनी रेहाना यांच्याशी संपर्क साधला. ओक्साबोक्शी रडत त्यांनी रेहाना यांच्याकडे मदत मागितली. रेहाना यांनी खटपट करून त्यांना टोसिलीझुमॅब उपलब्ध करून दिले. साहाय्यकाच्या आईने करोनावर मात के ली. त्या घरी आल्या. मात्र दोनच आठवड्यांत त्यांचे निधन झाले.

अन्य एका प्रसंगात एका मंत्रालयीन कर्मचाऱ्यास कृ त्रिम श्वासनयंत्रणेची व्यवस्था असलेली रुग्णशय्येची आवश्यकता होती. रेहाना यांनी त्यासाठी मुंबई पालथी घातली. अखेर ठाण्यातील एका नामांकित रुग्णालयात त्यांनी या व्यक्तीसाठी रुग्णशय्या उपलब्ध करून दिली. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाहतूक पोलीस दलात कार्यरत अंमलदारासाठीही रेहाना यांनी प्लाझ्माची जुळवाजुळव के ली. प्लाझ्मा उपलब्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचाही मृत्यू झाला. ही तीन प्रसंगांची सल रेहाना यांना अद्याप आहे.

रेहाना शेख यांच्या धडपडीत पोलीस असलेले त्यांचे पती नासीर रेहाना यांना नेहमीच प्रोत्साहन देतात. रेहाना यांच्यामुळे मदत उपलब्ध झालेले अनेकजण, त्यांचे कु टुंबीय संपर्कात आहेत. ते विचारपूस करतात. सणउत्सवात शुभेच्छा देतात. हा संवाद मला आणखी मदत करण्यास अधिक बळ देतो, असे त्यांनी सांगितले.

 

कार्यतत्परता…

मुंबईसह महानगर प्रदेश, पुणे, नाशिक, सातारा, नागपूरमधील पोलीस, त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या संपर्कातून वेगवेगळ्या आर्थिक स्तरांतील नागरिक त्यांच्याकडे समस्या घेऊन येतात. रेहाना बहुतांशवेळा त्या तातडीने सोडवितात. ओळखदेख नसूनही त्यांची मदतीसाठीची तत्परता पाहून सारेच भारावून जातात.

महत्त्व का?  रेहाना यांनी पोलीस दलातील आपला जनसंपर्क वापरून सुरुवातीला रुग्णांना आवश्यक अशा खाटा, औषधे या स्वरूपात मदत केली. त्यानंतर त्यांनी समाजकार्य करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींशी समन्वय साधून रुग्णांसाठी मदतीचा परीघ वाढविला.

मदत खरेच देता येईल का, या विचारापेक्षा प्रयत्नांवर जोर दिला. कारण कुणीतरी आपल्यासाठी प्रयत्न करतेय, ही जाणीवही रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सकारात्मकता आणू शकते. अनेकांना माझ्यामुळे धीर मिळाला, वेळेत उपचार मिळाल्याने रुग्ण बरा झाला. काहींचे प्राण वाचले, याचे समाधान अमूल्य आहे. – रेहाना शेख

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Valuable contribution of women police corona patients in mumbai akp

ताज्या बातम्या