शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या तळोजा कारागृहात असलेले लेखक-कवी वरवरा राव यांनी काल रात्री चक्कर आल्याची तक्रार केल्यानंतर, त्यांना  मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिवसेंदिवस खालावत जाणारी तब्येत आणि करोनाचा वाढता संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जामीन देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने त्यांना आरोग्याच्या कारणास्तव जामीन देण्यास नकार दिल्यावर ८१ वर्षांच्या राव यांनी आता उच्च न्यायालयात तात्पुरत्या जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. तसेच विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणीही राव यांनी केली आहे. त्यांच्यासह प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांनाही तात्पुरता जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला होता.

राव यांनी शनिवारी सायंकाळी आपल्याला दूरध्वनीवरून संपर्क साधला होता, असे सांगत कारागृहात त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याचा दावा, राव यांच्या कुटुंबीयांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर राव यांच्या वकिलाने रविवारीच उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करत त्यावर मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. सोमवारीही त्यांच्या वकिलाने कारागृह प्रशासनाविरोधात याचिका केली. त्यात जे. जे. रुग्णालयाने दिलेल्या निर्देशानुसार राव यांची वैद्यकीय तपासणी केली जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय, कारागृह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, राव यांच्या वैद्यकीय तपासणीचा आणि त्यानुसार त्यांना काय सुविधा दिल्या याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varavara rao admitted to jj hospital in mumbai last night after he complained of dizziness in taloja prison msr
First published on: 14-07-2020 at 12:14 IST